मुळा धरणातून १८ सप्टेंबरला पाणी सुटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:52+5:302021-09-14T04:24:52+5:30
राहुरी : मुळा धरणात सध्या २२ हजार ९१४ दशलक्ष घनफूट (८८.१३ टक्के) पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. मुळा धरणाकडे सहा ...

मुळा धरणातून १८ सप्टेंबरला पाणी सुटण्याची शक्यता
राहुरी : मुळा धरणात सध्या २२ हजार ९१४ दशलक्ष घनफूट (८८.१३ टक्के) पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. मुळा धरणाकडे सहा हजार ९५१ क्यूसेकने कोतूळ येथून पाण्याची आवक सुरू असून, १८ सप्टेंबरला मुळा धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यास जायकवाडीकडे पाणी झेपावणार आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या पाण्याची पातळी १८०६.५० फुटांवर गेली आहे. सध्या धरणात उपयुक्त पाणीसाठा १८,४१४ दशलक्ष घनफूट इतका आहे. मुळा धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत. कोतूळ येथे दोन मिलीमीटर, तर मुळानगर येथे ६३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनंत चतुर्थी १९ सप्टेंबरला असून, त्यापूर्वीच पाणी सुटण्याची शक्यता आहे. मुळा धरणाकडे सहा हजार ९५१ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट व लाभ क्षेत्रावर पावसाने सरासरी ओलांडली नाही तरीदेखील मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. मुळा धरण भरल्यानंतर जायकवाडीकडे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी दक्षता घेण्याची गरज आहे. आज मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. सलग तीन वर्षापासून मुळा धरण भरत आहे.
..............
धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रात पावसाने सरासरी ओलांडली नाही. तरीदेखील मुळा धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाकडे अशीच आवक सुरू राहिल्यास मुळा धरण या आठवड्यात भरण्याची शक्यता आहे. २५ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा मुळा धरणात जमा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.
- अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण, शाखा अभियंता