पाचेगाव-कारवाडी रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:11+5:302021-05-01T04:19:11+5:30
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील कारवाडी रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून गेल्या महिनाभरापासून हे काम बंद ...

पाचेगाव-कारवाडी रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील कारवाडी रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून गेल्या महिनाभरापासून हे काम बंद अवस्थेत आहे. स्थानिक जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंत्यांनी या कामात लक्ष घालून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत मंजूर असलेल्या या पुलाच्या कामाला गेल्या महिन्यात सुरुवात झाली होती. साधारण तीन लाख ३० हजार रुपये या पुलाच्या कामासाठी मंजूर करण्यात आले होते.
बांधकाम विभागाकडे पुलाचे निकृष्ट काम होत असल्याच्या तक्रारी करूनही कामात सुधारणा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. वाळू उपलब्ध असताना निकृष्ट डस्ट वापरली जात आहे. सिमेंट नळ्या फुटलेल्या अवस्थेत असून चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आल्या आहेत.
सिमेंट नळ्यांवर सिमेंट काँक्रिट रस्ता करण्याऐवजी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे कामाचा दर्जा खालावत असल्याचे चित्र आहे.
दीड महिन्यापासून ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवल्याने तसेच गेल्या महिनाभरापासून काम बंद असल्याने नागरिकांच्या येण्याजाण्याचा प्रश्नदेखील बिकट बनत चालला आहे. ठेकेदार नवीन असून या पुलाच्या कामापासूनच त्याचा श्रीगणेशा झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितले. त्यामुळे ठेकेदाराला अनुभव नसताना हे काम दिल्याने निकृष्ट होत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून केला जात आहे.
या पुलाचे काम गुणवत्तापूर्ण न झाल्यास पुढील काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी स्थानिक नागरिकांनी यावेळी दिला आहे.
---
पुलाच्या कामात विलंब झाला असून येत्या तीनचार दिवसांत काम सुरू न झाल्यास संबंधित ठेकेदाराला नोटीस काढण्यात येईल.
-गणेश सवाई,
अभियंता,
बांधकाम विभाग, नेवासा
---
३० पाचेगाव पूल
पाचेगाव-कारवाडी रस्त्यावरील या पुलाच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांना आक्षेप आहे.