गरिबाघरची असल्याने महिलेला पेटवून दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 23:12 IST2016-03-10T23:04:31+5:302016-03-10T23:12:40+5:30
अहमदनगर : गरीब घरातील आहे म्हणून शिविगाळ करीत अंगावर रॉकेल ओतून एका विवाहितेला रॉकेल ओतून पेटवून दिले. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता घडली.

गरिबाघरची असल्याने महिलेला पेटवून दिले
अहमदनगर : गरीब घरातील आहे म्हणून शिविगाळ करीत अंगावर रॉकेल ओतून एका विवाहितेला रॉकेल ओतून पेटवून दिले. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजता घडली. या प्रकरणी तिघांंविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून विवाहितेवर सध्या उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील हिवरे झरे येथील सारिका नवनाथ काटे या विवाहित महिलेचा सासरच्या मंडळीकडून नेहमी छळ सुरू होता. बुधवारी सकाळी ‘तू गरीब घरची आहे’, असे म्हणत सारिकाला पतीसह सासु-सासऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली आणि शिविगाळ केली. यावेळी त्यांनी ड्रममधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून काडी ओढून पेटवून दिले. पेटल्यानंतर सारिकाने स्वत:ला वाचविले. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत,असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी नवनाथ शिवाजी काटे (पती), शिवाजी विठोबा काटे (सासरे) आणि पार्वती शिवाजी काटे (सासू) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी ग्रामीणचे उपअधिक्षक आनंद भोईटे, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी भेट दिली. आर. ए. परदेशी गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)