अकोले तालुक्यातून डाळिंब होतेय हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:56+5:302021-07-19T04:14:56+5:30
अकोले : तालुक्यातील वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी यासह परिसरातील गावचा शिवार डाळिंबाचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र ...

अकोले तालुक्यातून डाळिंब होतेय हद्दपार
अकोले : तालुक्यातील वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी यासह परिसरातील गावचा शिवार डाळिंबाचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांत तेल्या रोग आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे जवळपास ८२ टक्के डाळिंबाचे क्षेत्र घटले आहे. आता डाळिबांची जागा जागा द्राक्ष, ऊस, कांदा व भाजीपाल्याने घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातून डाळिंब हद्दपार होऊ लागले आहे.
देश-विदेशातील बाजारपेठेत गुणवत्तेत सरस ठरलेली, निर्यातक्षम तालुक्याची डाळिंब शेती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तेल्या, मर रोग आणि शेतातील बोगस कृषी डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे डाळिंब क्षेत्र कमालीचे घटले आहे. दहा वर्षांपूर्वी तालुक्यात अडीच हजार हेक्टरवर डाळिंब शेती उभी होती. सध्या जेमतेम साडे चारशे हेक्टरवर डाळिंब तग धरून आहे.
राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड सुरू होण्यापूर्वी १९८९-९०मध्ये नगण्य प्रमाणावर डाळिंब शेती होती. त्यानंतर फळबाग शेतीबाबत शेतकऱ्यांची वाढलेली सकारात्मकता आणि जागतिकीकरणाच्या धोरणात जगाची बाजारपेठ खुली झाल्याने शाश्वत आणि अधिक उत्पन्नाची हमी डाळिंब पिकामुळे मिळाली. २०१०पर्यंत डाळिंब क्षेत्रात मोठी वाढ झाली.
त्यानंतर हळूहळू तेल्या, मररोग, बुरशीजन्य आजाराने डाळिंब शेतीला झपाटल्याने फळबागा मरणासन्न अवस्थेला गेल्या. रोगांचे अतिक्रमण आणि बागांमध्ये घुसलेले बोगस मार्गदर्शक ही दोन्ही संकटे डाळिंबाच्या मुळावर आली आहेत. सल्ल्यामुळे एकरी उत्पादन खर्च तर वाढतोच, शिवाय पीक संकटात ढकलले जाते.
डाळिंब उत्पादकांना चुकीचे सल्ले मिळत असल्याने तसेच बदललेला निसर्ग, वाढते जागतिक तापमान, रोगांचे आक्रमण यामुळे डाळिंबाचे क्षेत्रफळ घटत चालले आहे.
.......................
गावपारावरील शेतीविषयक सल्लागार चुकीचा सल्ला देतात. त्यामुळे डाळिंब शेतीचे नुकसान झाले आहे. सजग होऊन पिकांवर वेळोवेळी येणारे रोग निवारणासाठी शिकलेल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. शेतीविषयक कोणतेही संकट आल्यास शेतकऱ्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधावा. कृषी सहायकांचे मार्गदर्शन घ्यावे.
- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी
...................
वीरगाव, पिंपळगाव, वडगाव या डाळिंबाच्या आगारात केवळ १८ टक्के डाळिंब पीक तग धरून आहे. भाजीपाला वाढला. आता शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन न घेतल्यास शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते.
- ज्ञानेश्वर खुळे, शेतकरी, वीरगाव