कोपरगावात २७२ जागांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:17+5:302021-01-15T04:17:17+5:30
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. २९ ग्रामपंचायतींच्या २७९ जागांपैकी ७ जागा या सुरुवातीलाच ...

कोपरगावात २७२ जागांसाठी आज मतदान
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. २९ ग्रामपंचायतींच्या २७९ जागांपैकी ७ जागा या सुरुवातीलाच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २७२ जागांसाठी आज ( दि.१५ शुक्रवार ) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान पार पडणार आहे. यासाठी एकूण ६११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्य आजच ११२ मतदान यंत्रात बंद होणार आहे.
तालुक्यातील सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बुद्रुक, मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापूर, कोकमठाण, कासली, टाकळी, जेऊर पाटोदा या ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी सांगवी भुसार येथील ६ जागा व जेऊर कुंभारी येथील १ अशा ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २७२ जागांसाठी मतदान होणार आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप झाले. त्यानंतर लागलीच तालुक्यातील मात्तबर नेत्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी मतदारांची दारे वारंवार पिंजून काढली आहेत. या प्रचारात निवडणुकीतील उमेदवारांचे चिन्ह, गावच्या विकासाचा अजेंडा तसेच सत्ताधारी विरोधक यांचा एकमेकांवरील आरोप -प्रत्यारोपाच्या फैरीने या गावांतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. मात्र, नेत्यांसह उमेदवारांनी १० दिवस केलेल्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने आज मतदारांनी केलेल्या मतदानरुपी दानातूनच उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या नेत्याने, उमेदवाराने प्रचारात किती ? कस लावला यावरूनच आज दिवसभरात होणारे मतदान आणि त्यानंतर लागणाऱ्या निकालावरून चित्र स्पष्ट होणार आहे.
............
हे अधिकारी आहेत लक्ष ठेवून..
या निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, कोपरगावचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव, शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे हे लक्ष ठेऊन आहेत. तसेच निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, माधवी गोरे, मनीषा कुलकर्णी, अरुण रणनवरे यांच्यासह विविध खातेनिहाय अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
..........