मनपाच्या स्थायी समितीतही रंगणार राजकारण
By Admin | Updated: June 23, 2016 01:22 IST2016-06-23T00:42:27+5:302016-06-23T01:22:33+5:30
अहमदनगर: महापालिकेत महापौर निवडणुकीनंतर आता स्थायी समिती सभापती पदाचे राजकारण रंगणार आहे. अर्धवट स्थायी समितीत सदस्य

मनपाच्या स्थायी समितीतही रंगणार राजकारण
अहमदनगर: महापालिकेत महापौर निवडणुकीनंतर आता स्थायी समिती सभापती पदाचे राजकारण रंगणार आहे. अर्धवट स्थायी समितीत सदस्य नियुक्तीनंतर नवीन सभापती निवड महिनाभरात होईल. एकीकडे सभापती पदाची संधी मनसेला की अपक्षांना याची उत्सुकता आता निर्माण झाली असताना दुसरीकडे स्थायी समितीचे संख्याबळही समसमान होत आहे. सभापती पदाच्या निवडणुकीतही फोडाफोडीचे राजकारण पुन्हा एकदा नगरकरांना पहावयास मिळेल.
स्थायी समितीचे सोळा सदस्य असून त्यातील आठ सदस्य फेबु्रवारी महिन्यात निवृत्त झाले आहेत. विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादी आघाडीने नवीन सदस्य नियुक्त न करता आठ सदस्यांवरच स्थायी समितीचा कारभार चालविला. सभापती गणेश भोसले यांनी मोठ्या चलाखीने समिती चालविली. आता महापालिकेत सेनेचा महापौर झाला आहे. त्यामुळे नव्याने आठ सदस्य नियुक्त करून सभापती भोसले यांच्याऐवजी नवीन सभापती नियुक्त केला जाईल. मात्र हे करत असताना सत्तापक्षात बसलेली सेना व विरोधक आघाडी यांचे स्थायी समितीतील संख्याबळ समसमान म्हणजे ८-८ होईल. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत सेनेला पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण करावे लागणार आहे. महापौर पदाची लढाई जिंकताना मनसेच्या सुवर्णा जाधव आणि विणा बोज्जा यांना सेनेकडून स्थायी समितीचा शब्द देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मनसेचे गणेश भोसले व किशोर डागवाले यांना शह म्हणून सेना मनसेलाच पुन्हा सभापती पदाची संधी देण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीत सेनेचे अनिल बोरुडे, विद्या खैरे व छाया तिवारी, भाजपचे श्रीपाद छिंदम, उषा नलावडे असे पाच सदस्य आहेत. महासभेतून दोन तर सेनेला निवृत्तीबदल्यात एक सदस्य नियुक्त करता येणार आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ आठवर पोहचते. राष्ट्रवादी ४ आणि कॉँग्रेसचा १ सदस्य नव्याने स्थायी समितीत जाईल. राष्ट्रवादी-कॉँग्रेस-मनसे आघाडीचे आठ सदस्य स्थायी समितीत असतील. त्यामुळे दोन्हींचे संख्याबळ समसमान झाले तर मात्र चिठ्ठी टाकून सभापती पदाची निवड होऊ शकते.