घटस्फोट होताच राजकारण तापले

By Admin | Updated: September 26, 2014 00:17 IST2014-09-26T00:07:43+5:302014-09-26T00:17:52+5:30

अहमदनगर : पंधरा दिवसांपासून युती आणि आघाडीचा सुरू असलेला घोळ गुरूवारी संपला आहे.

Politics erupted as soon as divorce took place | घटस्फोट होताच राजकारण तापले

घटस्फोट होताच राजकारण तापले

अहमदनगर : पंधरा दिवसांपासून युती आणि आघाडीचा सुरू असलेला घोळ गुरूवारी संपला आहे. भाजपाच्या पत्रकार परिषदेने २५ वर्षापूर्वीची युती संपुष्टात आल्याची तर राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेने आघाडी संपुष्टात येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. युती-आघाडीच्या फाटाफुटीचा निर्णय होताच जिल्ह्यातील राजकारण तापले असून उमेदवारीसाठी इच्छुकांची एकच धावपळ उडाली आहे.
जागावाटपावरून आघाडी आणि युतीत ताणाताणी सुरू होती. आता तुटणार, नंतर तुटणार, पुन्हा समेट अशा बातम्या आठ दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, याच काळात युती आणि आघाडीतील चारही पक्षांनी जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघातून इच्छुकांची चाचपणी पूर्ण करून ठेवली होती. चारही पक्षांकडून युती आणि आघाडी संपुष्टात येण्याच्या घोषणेची वाट पाहिली जात होती.
गुरूवारी सायंकाळी ही घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले. उमेदवारीसाठी अनेकांची धावपळ सुरू झाली. काही ठिकाणी उमेदवारांकडून पक्षाकडे तर काही ठिकाणी पक्षाकडून उमेदवारांना फोनाफोनी सुरू झाली आहे. जिल्ह्यात सेना,भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशी पंचरंगी लढती रंगणार आहेत.
(प्रतिनिधी)
मतदारसंघनिहाय पक्ष व उमेदवार
नगर शहरातून सेनेचे अनिल राठोड, काँग्रेसचे सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप मैदानात आहेत. भाजपाकडून सुवेंद्र गांधी, गीतांजली काळे, अभय आगरकर यांच्यापैकी एक उमेदवार असू शकतो. वसंत लोढा मनसेतर्फे निवडणूक रिंगणात आहेत.
नेवासा तालुक्यातून राष्ट्रवादीकडून शंकरराव गडाख, मनसेकडून दिलीप मोटे मैदानात आहेत. भाजपाकडून बाळासाहेब मुरकुटे भाजपा, सेनेचे बाळासाहेब पवार आणि अरूण वाकचौरे काँग्रेस हे संभाव्य उमेदवार असू शकतात.
शेवगाव-पाथर्डीत राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाकडून उमेदवाराचा शोध सुरु आहे. हर्षदा काकडे, सी.डी फकिर, मोनिका राजळे, अर्जुन शिरसाठ, काशिनाथ लवांडे यांची नावे चर्चेत आहेत. हेच चेहरे विविध पक्षांकडून रिंगणात असण्याची शक्यता आहे.
४पारनेरात शिवसेनेचे आ. विजय औटी यांना आव्हान देण्यासाठी भाजपाकडून विश्वनाथ कोरडे आणि रामदास भोसले यांच्यापैकी एकाच्या नावावर विचार करु शकते. काँग्रेसकडून राहुल झावरे, राष्ट्रवादीकडून काशिनाथ दाते, सुजित झावरे यांच्यासह अन्य इच्छुकांपैकी एकाचे नाव अंतिम होऊ शकते. मनसेकडून बाबासाहेब तांबे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
अकोल्यातून शिवसेनेकडून मधुकर तळपाडे यांचे नाव अंतिम झाल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादीकडून वैभव पिचड मैदानात आहेत. भाजपाकडून अशोक भांगरे मैदानात उतरु शकतात. मात्र काँग्रेस कोणाला संधी देणार, हा प्रश्न चर्चेचा असेल.
श्रीगोंद्यातून सेनेकडून जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे लढतील, हे निश्चित आहे. भाजपाकडून बबनराव पाचपुते तर राष्ट्रवादीने राहुल जगताप यांचे नाव अंतिम केलेले आहे. आघाडीत पडलेल्या फुटीचा या ठिकाणी काय परिणाम होतो, हे लवकरच दिसणार आहे.
कर्जत- जामखेड मतदारसंघात आ.राम शिंदे यांच्यासमोर आता शिवसेनेकडून प्रा. मधुकर राळेभात, रमेश खाडे यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल. काँग्रेसकडून प्रवीण घुले, मीनाक्षी साळुंके, राजेंद्र निंबाळकर, अंबादास पिसाळ यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड यांच्यात स्पर्धा आहे.
४संगमनेरमध्ये काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांना सेनेचे बाबासाहेब कुटे, भाजपाकडून साहेबराव नवले यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी याठीकाणी कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे.
शिर्डीत काँग्रेसकडून मंत्री राधाकृष्ण विखे रिंगणात आहेत. सेनेकडून अभय शेळके, भाजपाकडून राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे हे पर्याय आहेत. राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागणार आहे.
राहुरीत भाजपाकडून विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीकडून प्रसाद तनपुरे किंवा शिवाजी गाडे, काँग्रेसकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, तान्हाजी धसाळ आव्हान देताना दिसण्याची शक्यता आहे.
कोपरगावातून सेनेकडून आशुतोष काळे, काँग्रेसकडून राजेश परजणे तर राष्ट्रवादी किंवा भाजपा यापैकी बिपीन कोल्हे कोणता पर्याय निवडतात हे लवकरच समोर येईल.
श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आ. भाऊसाहेब कांबळे यांना संधी मिळाली आहे. सेनेकडून लहू कानडे, राष्ट्रवादीकडून हनुमंत डोळस मैदानात असतील. मात्र भाजपाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे असतील की आणखी कोणी, हे दोन दिवसात स्पष्ट होईल.

Web Title: Politics erupted as soon as divorce took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.