बेलवंडी गटात राजकीय समीकरण बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 00:49 IST2016-10-07T00:27:16+5:302016-10-07T00:49:25+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने या गटातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत

बेलवंडी गटात राजकीय समीकरण बदलणार
श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने या गटातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, या आरक्षणामुळे महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांचा जि.प. मधील प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जाते.
बेलवंडी गट ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांचा बालेकिल्ला असला, तरी या गटातील सत्ता-समीकरणांची चावी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या हाती आहे. त्यामुळे जि. प. निवडणुकीसाठी तटबंदी मजबूत करण्यासाठी नागवडे गटास तडजोडीचे राजकारण करावे लागणार आहे.
बेलवंडी गट महिलेसाठी आरक्षित झालेला असला, तरी पंचायत समिती गण सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुला आहे. श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले होण्याची संधी अधिक आहे. त्यामुळे या गणात अण्णासाहेब शेलार यांचे कार्ड काँग्रेसला वापरावे लागण्याची शक्यता आहे. भाजपाकडून नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव हिरवे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. तसे झाल्यास अण्णासाहेब शेलार यांचे नागवडे साखर कारखान्यात राजकीय पुनर्वसन करावे लागणार आहे. हंगेवाडी गण सर्वसाधारणसाठी खुला असला तरी धनगर समाजाच्या मतांच्या गोळाबेरीजमुळे सर्वसाधारण जागेवर धनगर समाजाला दोन्ही गटांना संधी द्यावी लागणार आहे.