राजकीय कार्यकर्त्याचा कोकणगावात खून ?
By Admin | Updated: October 5, 2014 23:57 IST2014-10-05T23:51:43+5:302014-10-05T23:57:11+5:30
संगमनेर : अज्ञात मारेकऱ्यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रकाश मनोहर पवार (वय ५५, रा. कोकणगाव) यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना घडली.

राजकीय कार्यकर्त्याचा कोकणगावात खून ?
संगमनेर : अज्ञात मारेकऱ्यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रकाश मनोहर पवार (वय ५५, रा. कोकणगाव) यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना संगमनेर-लोणी रस्त्यावरील एका धाब्यासमोर घडली. ऐन निवडणुकीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
पोलिसांची माहिती अशी, रविवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास संगमनेर-लोणी रस्त्यावर कोकणगाव शिवारात भाग्यलक्ष्मी धाब्यासमोरील पटांगणात गंभीर जखमी अवस्थेत प्रकाश पवार हे निपचित पडलेले असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. दरम्यान कैलास बन्सी पवार यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मयत प्रकाश पवार यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवई व गालावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेला असता पवार हे मयत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पवार हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ऐन निवडणुकीत ही घटना घडल्याने त्यांचा खून करण्यात आल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीत ही घटना घडल्याने कोकणगाव परिसरात खळबळ उडाली आहे़ पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
(प्रतिनिधी)