अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला पोलिसांनी मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत नगर प्रेस क्लबने तोफखाना पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदविला. नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे यांना पोलिसांनी मारहाण केली.आज महापालिकेच्या निवडणुक मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी मतदानास गेलेल्या नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे यांना पोलिसांनी मारहाण केली. मतदान सुरू असताना संदीप रोडे पत्नीसह ज्ञानसंपदा शाळेत मतदानासाठी गेले होते. मोबाईल आत नेण्यास बंदी असल्याने रोडे बाहेर थांबले होते. तेथे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी रोडे यांना काठीने मारहाण करून पोलिसाच्या गाडीत टाकून तोफखाना पोलिस ठाण्यात आणले. तेथे इतर आरोपींसमवेत कोठडीत टाकले. कोणताही गुन्हा दाखल नसताना थेट पोलिस कोठडीत टाकले, तसेच मतदान करण्यास गेल्याने मारहाण करणे या कारणाने अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, सचिव मुरलीधर कराळे तसेच सर्व सदस्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आल्यानंतर त्यांनी त्रिस्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन दिले आले. दरम्यान, या घटनेचा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी पोलिस ठाण्यात येवून निषेध व्यक्त केला.नागरिकांवार पोलिसांचा दबाव : आमदार जगतापपत्रकारांवर झालेला अन्याय सहन करणार नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. पोलिसांच्या दबावाखाली नागरिक मतदानालाही बाहेर पडण्यास तयार नसल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.पोलिसांची दादागिरी : राठोडपत्रकारांवरील हल्ला लोकशाहीला धोका आहे. पोलिसांकडूनच अशा प्रकारची होणारी दडपशाही सहन करणार नसल्याचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी व्यक्त केले.
अहमदनगरमध्ये मतदान करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला पोलिसांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 16:23 IST