खासगी सावकारकी मोडीत काढण्यासाठी पोलीस सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:12+5:302021-06-09T04:26:12+5:30
जामखेड : तालुक्यातील खासगी सावकारकीचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून, जर कोणी खासगी सावकार पैशासाठी ...

खासगी सावकारकी मोडीत काढण्यासाठी पोलीस सरसावले
जामखेड : तालुक्यातील खासगी सावकारकीचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली असून, जर कोणी खासगी सावकार पैशासाठी त्रास देत असेल, तर न घाबरता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.
जामखेड पोलीस स्टेशनने मागील ४ दिवसांपासून याबाबत जनजागृती करण्यासाठी शहरात रिक्षा फिरवत, तसेच सोशल मीडियावरून नागरिकांना आवाहन केले जात आहे. कोणीही अवैध सावकारकी करू नये. कोणत्याही ग्रामस्थांना सावकाराकडून वसुलीसाठी त्रास होत असेल, तर तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा.
कोणताही तक्रारदार हा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आल्यास, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सावकाराकडून होणार नाही, याची पोलीस काळजी घेतील. कोणत्याही सावकाराविरुद्ध तक्रार असल्यास त्वरित संपर्क करावा. तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाईल, असे आवाहन गायकवाड यांनी करीत त्यांच्या संपर्क क्रमांकही जाहीर केला आहे. खासगी सावकारी मोडीत काढण्यासाठी जनतेने पुढे येण्याची गरज पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्यक्त केली.