काळ्या फितीने पोलिसांचा निषेध

By Admin | Updated: June 8, 2014 00:36 IST2014-06-07T23:52:11+5:302014-06-08T00:36:39+5:30

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील सुपेकर यांच्या बंगल्यावर दरोडा पडून पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही कर्जत पोलिसांना

Police prohibition by black bars | काळ्या फितीने पोलिसांचा निषेध

काळ्या फितीने पोलिसांचा निषेध

कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील सुपेकर यांच्या बंगल्यावर दरोडा पडून पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही कर्जत पोलिसांना तपासात आलेले अपयश तसेच ३१ मेच्या रास्ता रोको आंदोलनात चौदा जणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी काळ्या फिती लावून घोषणा देत कुळधरण चौफुल्यावर कर्जत पोलिसांचा निषेध केला.
आंदोलनात गुन्हे दाखल झालेले शेतकरी संघटनेचे अशोक जगताप, उपसरपंच सतीश कळसकर, सुधीर जगताप, चंद्रकांत जगताप, सुनील सुपेकर यांनी ग्रामस्थ तसेच व्यवसायिकांशी यासंदर्भात सकाळी चर्चा केली. त्यानुसार ग्रामस्थांनी काळ्या फिती लावून निषेध करण्याचा निर्णय घेतला. सकाळी दहा वाजता ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब गजरमल, भाऊसाहेब सुपेकर, महेंद्र जगताप, आबासाहेब डमरे, गोदड जगताप, राजेंद्र जगताप, दत्ता कुलथे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी घोषणा देत पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
तपासात काहीच निष्पन्न न झाल्याने हतबल झालेल्या पोलीस निरीक्षकांनी कुळधरणकरांसमोर हात टेकले. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता आक्रमक आंदोलनकर्त्यांना तसेच तालुका दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना फोन करून मी आपल्याशी चर्चा करण्यासाठी येत असल्याचे सांगितले. शुक्रवारी रात्री नऊ वाजता पोलीस निरीक्षक चव्हाण कुळधरणमध्ये आले. सुरुवातीला संतप्त ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ‘तुमचे काम तुम्ही करा, आम्ही मदतीला तयार आहोत. दरोड्याचा तपास न लावता लोकांवर गुन्हे दाखल करता’ या शब्दात सुनावले.
उपसरपंच कळसकर, अशोक जगताप यांनी गुन्हा दाखल करायला आमचे गुन्हे सांगा. दरोडेखोरांचे हल्ले सहन करून आम्हीच आरोपी का व्हायचे? असे थेट प्रश्न अधिकाऱ्यांना केले. दिलीप सुपेकर, बाळासाहेब गजरमल याच्यासह ग्रामस्थांनी आंदोलन केल्याच्या रात्रीपासूनच गस्त घालणारी गाडी यायची का बंद झाली, असा सवाल केला.
(वार्ताहर)
आंदोलनाचा धसका
३१ मेच्या रास्ता रोको आंदोलनात ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी ग्रामसभेत निर्णय घेऊनच सर्वानुमते शनिवारी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाचा पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी धसका घेतल्याचे दिसले.

Web Title: Police prohibition by black bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.