पोलिसांनी अब्रू राखली
By Admin | Updated: November 28, 2014 01:15 IST2014-11-28T00:47:43+5:302014-11-28T01:15:37+5:30
श्रीरामपूर : न्यायालयाने शिक्षा सुनावताच तेथूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तीन आरोपी पसार झाल्याने श्रीरामपूर शहर पोलिसांची बुधवारी अब्रू गेली

पोलिसांनी अब्रू राखली
श्रीरामपूर : न्यायालयाने शिक्षा सुनावताच तेथूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तीन आरोपी पसार झाल्याने श्रीरामपूर शहर पोलिसांची बुधवारी अब्रू गेली. पण प्रयत्नांची शिकस्त करून त्यांनी रात्रीतूनच या आरोपींच्या पुन्हा मुसक्या बांधल्याने गेलेली अब्रू वाचविण्यात यश आले.
सचिन बबन भोसले (वय २४), नितीन बबन भोसले (वय २६), रेखा त्रिभुवन या तिघा आरोपींना बुधवारी श्रीरामपूर न्यायालयाने १० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ऐकताच या आरोपींनी न्यायालयातच पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळ काढला. न्यायालयाने शिक्षा सुनावलेले आरोपी न्यायालयातूनच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. आपली अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून पोलिसांनी बुधवारी पोलीस डायरीला याबाबत नोंद न करता हे प्रकरण दडपून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. न्यायालयाच्या आवारातील वकील, पक्षकार व इतर नागरिकांच्या गर्दीमुळे आरोपी न्यायालयाच्या आवारातून पसार होण्यात यशस्वी झाले. आरोपी पसार झाल्यामुळे हादरलेल्या पोलीस यंत्रणेने लगेचच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक राकेश ओला, निरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक निरीक्षक मनोजकुमार राठोड, पाळदे, फौजदार अनिल भिसे यांची ३ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. त्यांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला. ओला व सपकाळे यांनी स्वत:कडे तपासाची सूत्रे घेत रात्रभर परिसर पिंजून काढला. लाल पल्सरवर हे आरोपी खंडाळा, रांजणखोलमार्गे पळाल्याची माहिती मिळाल्यावरुन त्यांच्या सर्व नातेवाईकांपर्यंत पोहचून पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा दवणगाव (ता. राहुरी) येथे आरोपी महिलेचे नातेवाईक असल्याची माहिती समजली. त्यानुसार सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिसे, हे.काँ. नाणेकर, कर्डिले, जाधव यांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा तेथे तिन्ही आरोपी झोपल्याचे दिसले अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला. या तिघांच्या मुसक्या बांधून त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपींना पकडण्यासाठी सपकाळे यांनी मोबाईल लोकेशनची मिळविलेली माहिती सहाय्यभूत ठरली. या आरोपींविरूद्ध पोलीस हवालदार एकनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून भादंवि ३५३, २२४ नुसार नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)