जिल्ह्यातील अडीच हजार सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:47+5:302021-03-21T04:19:47+5:30
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या टू-प्लस योजनेंतर्गत पोलिसांनी २ हजार ६४० गुन्हेगारांची ...

जिल्ह्यातील अडीच हजार सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची नजर
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या टू-प्लस योजनेंतर्गत पोलिसांनी २ हजार ६४० गुन्हेगारांची यादी अद्ययावत केली आहे. या गुन्हेगारांचे पोलीस ठाणेनिहाय मेळावे घेऊन ‘आता पुन्हा गुन्हा केला तर कठोर कारवाई केली जाईल’, अशी तंबी दिली जात आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांना आता चांगलाच वचक बसणार आहे.
टू-प्लस योजनेंतर्गत शनिवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आयोजित मेळाव्यात जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः गुन्हेगारांची माहिती घेत त्यांना समज दिली. यावेळी दोन व त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या चाळीसजणांना बोलावण्यात आले होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख उपस्थित होते. जिल्ह्यात आतापर्यंत अशा स्वरूपाचे सहा मेळावे घेण्यात आले आहेत. टू-प्लस योजनेंतर्गत मालमत्तेसंदर्भात गुन्हे करणारे ९७५ तर शरिराविरोधात गुन्हे करणाऱ्या १ हजार ६६५ जणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर आता कायमस्वरूपी पोलिसांची नजर राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचाही अशाच स्वरूपाचा मेळावा घेण्यात आला.
...........
२०० टोळ्यांचा समावेश
टू-प्लस योजनेंतर्गत अन्य सराईत गुन्हेगारांसह संघटित गुन्हे करणाऱ्या दोनशे टोळ्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. या सर्व माहितीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर सराईत गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळणार आहे.
.........
राज्यातील पथदर्शी उपक्रम
पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे सोलापूर येथे कार्यरत असताना, त्यांनी तेथेही टू-प्लस योजना यशस्वीरित्या राबवली होती. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही योजना अतिशय उपयुक्त असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यांतही ही योजना आगामी काळात राबवली जाणार असल्याचे समजते.
........
गुन्हेगारीत नगर प्रथम स्थानी
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्थानिक व बाहेरील गुन्हेगारांचा या गुन्हेगारी कृत्यात सहभाग आहे. आगामी काळात मात्र सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
...........
दोन अथवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती टू-प्लस योजनेंतर्गत संकलित करण्यात आली आहे. या गुन्हेगारांना एकत्रित बोलावून त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली जात आहे. यातून पोलिसांची कायमस्वरूपी नजर या गुन्हेगारांवर राहणार आहे तसेच एखाद्या गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केला तर त्याच्यावर तत्काळ पुढील कारवाई करणे शक्य होणार आहे.
- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर
ओळी - भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात टू-प्लस योजनेंतर्गत गुन्हेगारांची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
फोटो- २० भिंगार पोलीस