अहमदनगर शहरातील कचरा डेपोला पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 20:44 IST2018-03-22T20:42:51+5:302018-03-22T20:44:23+5:30
सोमवारपासून तीन दिवस सलग शहरातील जागेवरच ठप्प झालेला कचरा अखेर बुधवारी रात्रीपासून उचलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. रस्त्यात थांबलेली वाहने बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांच्या बंदोबस्तात सावेडी डेपोत नेण्यात आली.

अहमदनगर शहरातील कचरा डेपोला पोलीस बंदोबस्त
अहमदनगर : सोमवारपासून तीन दिवस सलग शहरातील जागेवरच ठप्प झालेला कचरा अखेर बुधवारी रात्रीपासून उचलण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. रस्त्यात थांबलेली वाहने बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांच्या बंदोबस्तात सावेडी डेपोत नेण्यात आली. वाहनांमधील कचरा ओतण्याचे काम सुरू झाले असून डेपोवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने डेपोभोवती सुरू ठेवलेल्या आंदोलनाची तलवार म्यान केली असून आता लोकशाहीपद्धतीने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या पाठीमागे असलेला कचरा डेपो हलविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर आणि स्थानिक नागरिकांनी सोमवारपासून सावेडी कचरा डेपोत जाणारी कचºयाची वाहने अडविली होती. हे आंदोलन दोन दिवस सुरूच होते. त्यामुळे शहरातील सर्व कचरा जागेवरच होता. सावेडी येथील कचरा डेपो कोणत्याही परिस्थितीत हलविला जाणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांनी घेतली. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम यांनी थेट जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देत कचरा वाहने खाली करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. त्यानंतर अधिक्षकांनी बंदोबस्त तैनात केला. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत तोफखाना पोलिसांनी बुधवारी कचरा डेपोची पाहणी केली होती. मात्र तेथे सर्वकाही सुव्यवस्थित असल्याने विनाकारण नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी संपत बारस्कर यांच्यासह चार आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर बुधवारी रात्रीच पोलीस बंदोबस्तात वाहने डेपोत खाली करण्याचे काम सुरू झाले.
- पोलिसांनी बजावल्या नोटीसा
- शहरातील शांततेत बाधा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी नगरसेवक संपत बारस्कर यांच्यासह चार आंदोलनकर्त्यांना नोटीसा बजावल्या. वाहने डेपोत जाण्यास प्रतिबंध केल्यामुळे शहरातील शांततेस बाधा येवू शकते. कचरा जागेवरच राहिल्याने शहरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होवू शकतो. शहरातील अनेक नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मागितल्यानुसार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे शांतता भंग होवू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे कृत्य करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.