हिरण हत्याकांडातील आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:37+5:302021-03-15T04:19:37+5:30
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : बेलापूर येथील गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण व हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना ...

हिरण हत्याकांडातील आरोपींना पोलीस कोठडी
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : बेलापूर येथील गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण व हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश खाडे, संदीप मुरलीधर हांडे, जुनेद उर्फ जावेद बाबू शेख, अजय राजू चव्हाण (सर्व, रा. सिन्नर, जि. नाशिक), नवनाथ धोंडू निकम (उक्कडगाव, ता. कोपरगाव) यांचा समावेश आहे. शनिवारपर्यंत या सर्व आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आकाश खाडे हा हिरण त्यांच्याकडे काही वर्षांपूर्वी कामाला होता. तोच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपींवर अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी अटक केलेले सागर गंगावणे व बिटू वायकर या दोन संशयित आरोपींची पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपत आहे. त्यामुळे उद्या सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुन्ह्याच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गुन्ह्यातील काही बाबींवर अद्याप प्रकाश पडलेला नाही. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे करत आहेत.