गावठी कट्टे विकणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: July 25, 2014 00:25 IST2014-07-25T00:11:21+5:302014-07-25T00:25:42+5:30

अहमदनगर : केडगाव येथील पेट्रोल पंपावर गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या आधीच्या चार आरोपींकडून आणखी चार जणांचा शोध लागला.

Police cell detained for sale | गावठी कट्टे विकणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

गावठी कट्टे विकणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

अहमदनगर : केडगाव येथील पेट्रोल पंपावर गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या आधीच्या चार आरोपींकडून आणखी चार जणांचा शोध लागला. पोलीस उपविभागीय अधिकारी वाय.डी. पाटील यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री पुण्यात आणखी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून विक्रीसाठी असलेले तीन गावठी कट्टे आणि सहा जीवंत काडतुसेही जप्त केली आहेत. चारही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एस. तोडकर यांनी २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
केडगाव येथील पेट्रोल पंपावर मध्यरात्री गोळीबार करून पळ काढणाऱ्या चौघांना सुपा पोलिसांनी एका तासात पुणे मार्गावर पकडले होते. त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे आणि चार जीवंत काडतुसे आढळून आली होती. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली होती. हे चौघे पोलीस कोठडीत असताना त्यांनी आलमगढ येथून गावठी कट्टे विकत मिळत असल्याची माहिती दिली होती. मध्यप्रदेशातून कट्टे आणणारे आणखी चौघे पुण्यात असल्याचे त्यांनी पोलिसांना तपासादरम्यान सांगितले.
चौघांपैकी बंटी हा आरोपी पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. यावेळी त्याची पुण्यातील आणखी चौघांशी ओळख झाली होती. त्यांच्याकडूनच बंटी हा कट्टे घेवून नगरमध्ये आणून विक्री करीत होता. वाय.डी. पाटील यांच्या विशेष पथकाने मंगळवारी पुण्यात चौघांना अटक केली आहे. रामकुमद जुनासिंग राजपूत (रा. मध्यप्रदेश), प्रवीण लहू कुचेकर (रा. बीड), विजय उर्फ व्हिसेंट (रा. पुणे), प्रदीप शिवाजी सोनटक्के (रा. पुणे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडे तीन कट्टे आणि सहा जीवंत काडतुसे आढळून आली आहेत, असे कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी सांगितले. मंगळवारी अटक केलेल्या चौघांनी तीन महिन्यांपूर्वीच गोळीबार करणाऱ्या चौघांना कट्टे विकल्याची त्यांनी माहिती दिली आहे. गोळीबाराच्या प्रकरणामुळे कट्टे विक्रीचा धंदा करणारी आठ जणांची टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. गुरुवारी दुपारी चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले. चौघांनी गावठी कट्टे आणखी कोणाला विकले, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे काय,याची चौकशी करण्यासाठी आरोपींना कोठडी द्यावी, असा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Police cell detained for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.