पर्यटकांना खुणावतोय भंडारदऱ्याचा जलोत्सव
By Admin | Updated: July 3, 2017 15:22 IST2017-07-03T15:22:32+5:302017-07-03T15:22:32+5:30
काळ्याभोर ढगांतून बरसणारे पावसाचे टपोरे थेंब़़़ ओल्याचिंब झालेल्या डोंगररांगा़़ गिरीशिखरांहून कोसळणारे पांढरे शुभ्र प्रपात़़ तुडूंब भरलेली भातखाचरे अन् थुई थुई नाचणाऱ्या जलधारा़

पर्यटकांना खुणावतोय भंडारदऱ्याचा जलोत्सव
राजूर : काळ्याभोर ढगांतून बरसणारे पावसाचे टपोरे थेंब़़़ ओल्याचिंब झालेल्या डोंगररांगा़़ गिरीशिखरांहून कोसळणारे पांढरे शुभ्र प्रपात़़ तुडूंब भरलेली भातखाचरे अन् थुई थुई नाचणाऱ्या जलधारा़़़ दुथडी भरून वाहणारे ओढेनाले़़़ हिरवीगार दुलई पांघरलेला निसर्ग असा भंडारदरा परिसरातील मनोहारी जलोत्सव पर्यटकांना खुणावतोय़
निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेला भंडारदरा धरणाचा परिसर पर्यटकांना आकर्षित करीत आहे. जुलै महिन्याचे कॅलेंडर उघडल्यानंतर सुरु होणारा जलोत्सव चालतो आॅगस्ट अखेरपर्यंत. गेल्या चार-पाच दिवसांपासून या परिसरात धो-धो पाऊस बरसत असल्यामुळे येथील जलोत्सवास सुरुवात झाली आहे.
राजूर सोडले की दहा किलोमीटरच्या अंतरावर रंधा धबधब्यापासूनच पर्यटनस्थळांना सुरुवात होते. हा धबधबा मोठ्या प्रमाणात वाहण्यास सुरुवात झाली नसली तरी येथे बांधलेले पादचारी पूल पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. धरणाच्या पाणलोटाच्या रिंगरोडच्या एका बाजूला असणारी सह्याद्रीची उंचच उंच पर्वत रांग, ओल्याचिंब झालेल्या या डोंगर रांगावरून उड्या मारीत पायथ्याकडे येणारे धबधबे व नेकलेस फॉल, नाणी फॉल, पांजरे फॉल आदी मोठे प्रपात, ओढ्या नाल्यांना आलेले नदीचे रूप पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
घाटघर परिसरात टपोऱ्या थेंबानी येणारी पावसाची सर. या सरीमागे कोकण कड्याच्या पायथ्याकडून येणारे दाट धुके, त्या पाठोपाठ येणारी वाऱ्याची झुळूक व पुन्हा पाऊस असा खेळ येथे सुरु आहे. दाट धुक्यात लपटलेली गिरीशिखरांची टोके पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात आणि यात भर घालतो तो येथील तजेला आलेला हिरवागार निसर्ग. या जोडीला अमृतेश्वराचे मंदिर, धो-धो वाहू लागलेली साम्रदची सांदण दरी असे एक ना अनेक पर्यटन स्थळे जलोत्सवात भर घालत आहेत. भंडारदरा परिसरात हा जलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता ओढ घेऊ लागली आहे. पर्यटक पावसात चिंब भिजण्याबरोबरच इथला निसर्गही डोळ्यांत साठवित आहेत.