पिंपळगाव माळवी तलावाला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:03+5:302020-12-13T04:35:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव माळवी : सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पिंपळगाव माळवी पंचक्रोशीला वरदान ठरलेला पिंपळगाव माळवी तलाव ...

पिंपळगाव माळवी तलावाला गळती
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव माळवी : सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पिंपळगाव माळवी पंचक्रोशीला वरदान ठरलेला पिंपळगाव माळवी तलाव तब्बल दहा वर्षांनंतर यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला. मागील दोन महिन्यांपासून सांडव्यातून पाणी वाहत होते; परंतु आता आवक बंद झाल्यामुळे सांडव्यातून पाणी पडणे बंद झाले आहे. मात्र, तलावाच्या आउटलेटचा वॉल लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून महानगरपालिकेचे याकड दुर्लक्ष होत आहे.
यावर्षी जून महिन्यापासून समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मागील तीन, चार वर्षांपासून कोरडाठाक पडलेला महानगरपालिकेचा पिंपळगाव माळवी तलाव यावर्षी ओसंडून वाहू लागला. त्यामुळे पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील जेऊर, डोंगरगण, मांजरसुंबा या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठा आनंद वाटला.
सध्या तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे; परंतु नगर शहराला जाणाऱ्या पाईपलाईनच्या आउटलेटमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. मागील तीन, चार महिन्यांपासून ही पाणी गळती होत आहे. महानगरपालिकेचे या गळतीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तलाव भरून देखील पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. तलावाच्या भिंतीवर खूप मोठी झाडे वाढली आहेत. त्यामुळे भिंतीला देखील धोका निर्माण झाला आहे.
...
मशिनरी भंगारमध्ये पडून
तलावाजवळच महानगरपालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. येथे कोट्यवधी रुपयांची मशिनरी भंगार होऊन पडून आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. महानगरपालिकेने या तलाव परिसराचा विकास केला तर शहरातील नागरिकांना जवळच पर्यटन केंद्र उपलब्ध होईल. या परिसरात रोजगार निर्मिती होईल.
...
फोटो-१२पिंपळगाव माळवी तलाव
...
ओळी : पिंपळगाव माळवी येथील नगरपालिकेच्या तलावातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे.