पिंपळगाव जोगे कालव्याचा पाणीप्रश्न पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:40+5:302021-03-15T04:20:40+5:30
अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावातील अनेक लाभार्थ्यांना पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाले नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी ...

पिंपळगाव जोगे कालव्याचा पाणीप्रश्न पेटला
अळकुटी : पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावातील अनेक लाभार्थ्यांना पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाले नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी थेट अळकुटी येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले. मात्र, तेथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी संतप्त झाले.
पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी अळकुटी, लोणी मावळा, पाबळ आदी गावांना मिळते. कालव्याचे पाणी सोडून अनेक दिवस होऊन गेले. परंतु, पारनेर तालुक्यातील अनेक गावांना रब्बी हंगामातील पाणी मिळालेच नाही. त्यामुळे पिके संकटात असून, पाणी कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जाब विचारण्यासाठी थेट अळकुटी येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले.
यावेळी तेथे अधिकाऱ्यांसह एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेश सरडे यांनी दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरडे यांनी सांगितले. पाणी लवकर न मिळाल्यास लाभार्थी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य डाॅ. भास्करराव शिरोळे, संदेश कापसे, डाॅ. सुभाष मावळे, संतोष शेंडकर, संपत शेंडकर, देवराज शेंडकर, नानाभाऊ मावळे, रावसाहेब कवडे, अशोक शिरोळे, बाळासाहेब कवडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
---
पिंपळगाव जोगे कालवा हा प्रत्येक आवर्तनाला चर्चेचा विषय ठरतो. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. मग तो खरीप, रब्बी, उन्हाळी असा कोणताही हंगाम असो. पाणी वाटपा नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना नेहमीच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे लवकरच आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन ही व्यथा मांडणार आहे.
-जितेश सरडे,
अळकुटी
---
१४ पिंपळगाव जोगे
पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले.