नगर शहरात कचऱ्याचे ढिग साचलेत, कुत्र्यांचा त्रास वाढलाय : स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांचा आरोप
By अरुण वाघमोडे | Updated: March 28, 2023 16:41 IST2023-03-28T16:41:21+5:302023-03-28T16:41:53+5:30
स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांचा आरोप.

नगर शहरात कचऱ्याचे ढिग साचलेत, कुत्र्यांचा त्रास वाढलाय : स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांचा आरोप
अहमदनगर: शहरात अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढिग साचले आहेत. नियमित रूटवर वेळेत घंटागाडी येत नाही. आली तरी पूर्ण कचरा घेऊन जात नाही. तसेच शहरात मोकाट कुत्र्यांचाही मोठा त्रास वाढला असून महापालिका प्रशासन काहीच कार्यवाही करताना दिसत नाही. असा आरोप स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केला. सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२८) मनपात स्थायी समितीची सभा झाली.
यावेळी समिती सदस्य तथा नगरसेवक विनित पाऊलबुधे, शेख नजीर अहमद, संपत बारस्कर, मुदस्सर शेख, सुनील त्र्यंबके, मंगल लोखंडे, सुनीता कोतकर, पल्लवी जाधव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसचिव एस.बी. तडवी आदी उपस्थित होते. नगरसेविका सुनीता कोतकर यांनी केडगाव परिसरात नियमित घंटागाडी येत नाही. गाड्यांचे स्पिकर बंद असल्याने गाडी आली तरी माहिती होत नाही, अशी तक्रार केली.
नगरसेवक पाऊलबुधे यांनी प्रभागात कधीच वेळेत घंटागाडी येत नाही, ठेकेदाराला ठेका देऊन दोन महिने झाले तरी कचरा संकलन अद्याप नियमित झालेले नाही, हे सर्व व्यवस्थित करण्यासाठी आता अधिकाऱ्यांनीच मैदानात उतरावे, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेविका पल्लवी जाधव यांनी तपोवन रोड परिसरात अनेक ठिकाणी रात्री ॲनिमल वेस्ट टाकले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे, अशी तक्रार केली.
नगरसेवक त्र्यंबके यांनी शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास वाढला आहे. कुत्रे पकडणारी गाडी प्रभागात येत नाही. आतापर्यंत किती कुत्रे पकडले, किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले. याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. यावर उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, निर्बिजीकरण केलेल्या कुत्र्यांच्या कानाला विशिष्ट प्रकारचा कट मारला जातो तसेच त्याचे ऑरगॉन ठेवले जातात. सभापती कवडे यांनी पुढील सभेला सदर ठेकेराला बोलावून घ्या, अशी सूचना दिली.