छळ इथला संपत नाही
By मिलिंदकुमार साळवे | Updated: August 18, 2017 19:53 IST2017-08-18T19:50:51+5:302017-08-18T19:53:11+5:30
अहमदनगर : अकोल्यापासून जामखेड. पाथर्डीपासून कोपरगाव. अशा जिल्हाभरातील अपंगांना जिल्हा शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्रच नाही तर साधी एक सही घ्यायची ...

छळ इथला संपत नाही
अहमदनगर : अकोल्यापासून जामखेड. पाथर्डीपासून कोपरगाव. अशा जिल्हाभरातील अपंगांना जिल्हा शल्य चिकित्सकांचं प्रमाणपत्रच नाही तर साधी एक सही घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी अहमदनगरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाने (सिव्हील हॉस्पिटल) बुधवार ठरवून दिलेला आहे. पण हाच ‘सिव्हील’चा बुधवार जिल्हाभरातून येणाºया अपंगांसाठी छळवार ठरतोय. बुधवार १६ आॅगस्टला ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये जिल्हा रूग्णालयात अपंगांचा छळ कसा होतो, हे दिसलं.
रामभाऊ डमाळे. श्रीरामपूरच्या गोंधवणी भागातून आलेले. दोन्ही पायांनी ते अपंग. त्यामुळे पूर्णपणे खरडत खरडतच त्यांना एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जावं लागतं. अपंग म्हणून रेल्वे प्रवासात सवलत मिळण्यासाठीचा पास काढण्यासाठी ते सकाळी ९ वाजता रूग्णालयात आले. त्यांना रेल्वे पासच्या अर्जावर जिल्हा शल्य चिकित्सकांचा सही, शिक्का पाहिजे होता. आता दुपारी ३ वाजत आले असताना ते निवासी वैद्यकीय अधिकाºयाच्या दालनासमोर भेटले. ६ तासात त्यांना ना जिल्हा शल्य चिकित्सक भेटले. ना निवासी वैद्यकीय अधिकारी.
प्राजक्ता कैलास वीरकर. ९ वर्षांची चिमुरडी. जन्मापासूनच मतीमंद. तिचे वडील कैलास व आई हे मायबाप प्राजक्ताअपंग, मतिमंद असल्याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आले होते. सोनई (ता. नेवासा) येथील धनगरवाडीहून ते सकाळी साडे नऊला इथं पोहोचले. एक नंबरला केसपेपर घेतला. तिथून त्यांना २७ नंबरला पाठवलं. इथं त्यांना कोणीच आत घेतलं नाही. तिथून त्यांना पुन्हा ३३ नंबरला पाठवलं. तिथून परत ४ नंबरला पिटाळलं. तिथून ते कागदपत्राच्या झेरॉक्स आणायला म्हणून बाहेर गेले. झेरॉक्स काढून परत येईपर्यंत ३३ नंबरमधले डॉक्टर गायब झाले होते.
रणजीत बाबासाहेब आव्हाड (रा. जांभळी, ता. पाथर्डी) हा युवक सकाळी ९ वाजता वडिलांना जांभळीहून घेऊन ‘सिव्हील’मध्ये पोहोचला. वडिलांना ऐकायला येत नाही. त्यामुळे कर्णबधिर असल्याचं प्रमाणपत्र घ्यायला तो वडिलांना घेऊन आला होता. केसपेपर काढून तो बराच वेळ एका कक्षाबाहेर बसला. बराच वेळ काहीच हालचाल दिसेना, म्हणून त्याने तिथल्या पांढºया साडीतल्या मावशींना विचारलं, ‘मावशी इथं पेशंटचे नंबर हायेत का न्हायी.’ तेव्हा ती मावशी त्याच्यावर डाफरतच म्हणाली ,‘नंबर फिंबर इथं नसतो. तुला थांबायचं तर नाही, तर निघून जा.’ आपल्यालाच गरज आहे म्हणून रणजीत वडिलांना घेऊन थांबला.
पण मावशीच्या उत्तराने, त्यांनी दिलेल्या उद्धटपणाच्या वागणुकीने तो आतल्या आत धुमसतच होता. पण नाईलाज होता. अपमान, मानहानी होऊनही तो निवासी वैद्यकीय अधिकाºयांची वाट पाहत होता. सिस्टरने उद्धट भाषा वापरल्याची तक्रार करीत इथं येणाºयांशी इथले कर्मचारी हे असे वागतात. यांना माणुसकी पण नाही. सकाळी ११ पासून इथं आहे. पण कोणी नीट बोलत नाही. एकही डॉक्टर, अधिकारी जागेवर भेटत नाही. भेटला तरी तुसडेपणाने बोलतात,तो सांगत होता.
नानासाहेब बाळकृष्ण पाटील. पायाने अपंग. रेल्वे पाससाठी सकाळी १० वाजेपासून आलेला. सकाळपासून ४ नंबरसमोर बसून होता. बबन काकासाहेब देशमुख (वय ४०)आदिवासी प्रवण अकोले तालुक्यातील औरंगपूरहून सकाळी १० वाजता जुन्या कार्डच्या नुतनीकरणासाठी आले होते. पोलिओमुळे अपंगत्व आलेलं. केसपेपर काढून ४ नंबरला गेलो. तिथून २७ नंबरला जायला सांगितलं. तिथून परत ४ नंबरला जायला सांगितलं. तिथून ५२ नंबरला पाठवलं. दुपारी ३ नंतर निवासी वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षातून एक जण केसपेपर,प्रमाणपत्रांचा गठ्ठा घेऊन दरवाजातून बाहेर डोकावत होता. मधूनच नीट बसा, रांग लावा. आम्ही कामं करायचे का नाही? म्हणत बाहेरच्या अपंगांवर ओरडत होता. त्याचा फोटो काढत असल्याचं दिसताच तो लगेच दरवाजातून आत पळाला.
श्रीरामपूर तालुका अंपग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खडके यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पी. बी. बोरूटे यांना मोबाईलवरून ‘सिव्हील’मधील आँखो देखा हाल सांगितला. त्यांनी हो...हो...पहातो, गाडेंना सांगतो. गाडेपण तिथं नाहीत का? म्हणून मोबाईल बंद केला. त्यांच्याशी ‘लोकमत’ने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आम्हाला सौजन्याने, प्रेमाने, माणुसकीची वागणूक द्या, एवढंच या अपंगांचं म्हणणं आहे. पण ‘सिव्हील’चा बुधवार म्हटलं की तुसडेपणा, अरेरावी, क्षणोक्षणी अपमान, हेटाळणी असा अनुभव घेत बुधवार म्हटलं की या अपंगांचा हा छळवारच ठरतोय.