साई संस्थानातील साडेतीनशे कोटीच्या प्रकल्पास परवानगी
By Admin | Updated: June 28, 2014 01:13 IST2014-06-27T23:42:52+5:302014-06-28T01:13:22+5:30
शिर्डी : सामान्य भाविकांचे दर्शन सुसह्य व आनंददायी करणाऱ्या साईदर्शन रांग व मंदिर परिसर पुनर्विकास प्रकल्पाला तसेच संस्थानच्या शैक्षणिक संकुलाचा आराखडा बनवण्यासाठी

साई संस्थानातील साडेतीनशे कोटीच्या प्रकल्पास परवानगी
शिर्डी : सामान्य भाविकांचे दर्शन सुसह्य व आनंददायी करणाऱ्या साईदर्शन रांग व मंदिर परिसर पुनर्विकास प्रकल्पाला तसेच संस्थानच्या शैक्षणिक संकुलाचा आराखडा बनवण्यासाठी संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने अनुमती दिली आहे़
साई संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी, समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अनिल कवडे व कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे यांनी या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला़ यावेळी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते़
एका पाठोपाठ येणाऱ्या नाशिक कुंभमेळा व साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता होती़ या प्रकल्पासाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपये खर्च आवश्यक आहे़ हा प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे़ व्यवस्थापनाने या प्रकल्पाची गरज ओळखून यास मान्यता दिली आहे़ आता हा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे़
याशिवाय हेलिपॅड रोडला असलेल्या साडे तेरा एकर क्षेत्रात साईबाबा संस्थानचे शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी आराखडा बनविण्यासही समितीने अनुमती दर्शवली आहे़ यामुळे जागेची अडचण दूर होणार आहे़ शिर्डी ग्रामस्थांनी
कन्या शाळेच्या मुलींसाठी बसेस सुरु करण्याची मागणी केली आहे़ याबाबतही आढावा घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने प्रशासनाला दिल्या आहेत़
आंतरराष्ट्रीय नकाशावर असलेल्या सार्इंच्या शिर्डीत केवळ बारावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे़ साईआश्रम दोनमध्ये सुरु असलेल्या सध्याच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीत जागेची उपलब्धता आहे़ व्यवस्थापनाने किमान पदवीपर्यतची शिक्षणाची व्यवस्था करण्याची गरज आहे़ सध्या बारावीनंतर अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहतात़
गुप्तचर यंत्रणा व पोलीस प्रशासनाने वारंवार आवश्यकता व्यक्त करुनही व्यवस्थापनाने प्रसादालय,भक्तनिवास व भाविकांच्या वर्दळीच्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यास अद्याप अनुमती दिली नाही़ मात्र संरक्षण कार्यालय, मंदिर अधीक्षक, मंदिर व्हीआयपी कक्ष, जनसंपर्क कार्यालय परिसर, द्वारकामाई परिसर, उदी वाटप रांगा, गुरुस्थानकडील बाजू आदी ठिकाणी तूर्तास कॅमेरे बसवण्यास परवानगी दिली आहे़
आतापर्यंत पाच लाखापर्यंतच्या कामाचे कोटेशन मागितल्यानंतर कामे होत होती़ व्यवस्थापनाने यातही पारदर्शकता आणण्यासाठी पन्नास हजारांच्या पुढील कामांची जाहिरात देऊन टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे़ गेल्याच आठवड्यात व्यवस्थापनाने टेंडर मंजूर करताना वाटाघाटी करण्याची पद्धतही बंद केली आहे़ याशिवाय साईबाबांना येणाऱ्या बहुमूल्य हिरे, जडजवाहिऱ्यांचे मूल्यांकन करण्यासाठीही निविदा मागवून एकापेक्षा अनेक व्हॅल्युअर नेमण्याचा व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे़ (तालुका प्रतिनिधी)