‘अमृतवाहिनी’ला पुणे विद्यापीठाची कायमस्वरूपी संलग्नता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:21+5:302021-01-15T04:17:21+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीमार्फत महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन आणि मूल्यमापन करून विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या ...

‘अमृतवाहिनी’ला पुणे विद्यापीठाची कायमस्वरूपी संलग्नता
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीमार्फत महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन आणि मूल्यमापन करून विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या ११ अभ्यासक्रमांना कायमस्वरूपी संलग्नतेस मान्यता दिली आहे. यापूर्वी पाच अभ्यासक्रमांना कायमस्वरूपी संलग्नता मिळालेली होती आणि महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रम कायमस्वरूपी संलग्नता प्राप्त झालेले आहेत. अशा प्रकारचे यश प्राप्त करणारे पुणे विद्यापीठातील ग्रामीण भागातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. महाविद्यालयातील कायमस्वरूपी शिक्षकांची संख्या, महाविद्यालयाचा निकाल जो विद्यापीठाने आतापर्यंत घेतलेल्या परीक्षेचा निकालाच्या कायम जास्त राहिलेला आहे, अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी आवश्यक आणि अद्ययावत शैक्षणिक साहित्य आणि प्रयोगशाळेची मुबलक उपकरणे उपलब्धता, महत्वाची पुस्तके, संदर्भ पुस्तके, जर्नल्स, विद्यार्थ्यांसाठी मानक जर्नल्स यासह सुसज्ज व अद्ययावत ग्रंथालय, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या उपाययोजना, कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाहनिधी सुविधा आणि अमृत स्टाफ वेल्फेअर फंड याबरोबरच अनेक बाबींची समितीने दखल घेऊन व प्रत्यक्ष सत्यता पडताळून सर्व अभ्यासक्रमाला कायमस्वरूपी संलग्नता देण्यात आली आहे.
अमृतवाहिनी महाविद्यालयात संशोधन संस्कृती वाढण्यासाठी आवश्यक व विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयास गतवर्षी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) संशोधनासाठी आणि प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण ५३ लाखांचे अनुदान मिळाले आहे. संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनीही महाविद्यालयाच्या चढत्या आलेखाबाबत समाधान व्यक्त केले.