आदिवासींच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम
By Admin | Updated: September 30, 2015 13:42 IST2015-09-30T13:42:25+5:302015-09-30T13:42:25+5:30
ज्या शिधापत्रिकांसाठी आदिवासींना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला, त्या संघर्षाला आज 'लोकमत'च्या पाठपुराव्यामुळे पूर्णविराम मिळाला.

आदिवासींच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम
>'लोकमत'च्या लढय़ाला यश : ३४ आदिवासींना मिळाल्या शिधापत्रिका
अहमदनगर : ज्या शिधापत्रिकांसाठी आदिवासींना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागला, त्या संघर्षाला आज 'लोकमत'च्या पाठपुराव्यामुळे पूर्णविराम मिळाला. शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते गणेशवाडीतील ३४ आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका तर २८ जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शिधापत्रिका हातात पडताच आदिवासींच्या चेहर्यावरील आनंद अवर्णनीय होता.
गणेशवाडी (जखणगाव, ता.नगर) येथील आदिवासी कुटुंबे संघर्ष करूनही शिधापत्रिकापासून वंचित असल्याचे वृत्त 'लोकमत'मधून प्रसिद्ध झाले. शिधापत्रिकाच नसल्याने शासकीय योजना व शिष्यवृत्ती या सर्वांपासूनच या आदिवासींना वंचित राहावे लागत होते. मोठा संघर्ष करूनही त्यांना शिधापत्रिका मिळत नव्हत्या. 'लोकमत'ने त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडताच प्रशासनाने गतिमान हालचाली करून आज जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते ३४ कुटुंबांना शिधापत्रिका गणेशवाडीत येऊन वितरीत केल्या. २८ जणांना जातीचे दाखले देण्यात आले. शिधापत्रिका हातात पडताच आदिवासींची चेहरे आनंदाने फुलून गेले. यावेळी आ.विजय औटी, प्रांताधिकारी वामन कदम, तहसीलदार सुधीर पाटील, पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले आदी उपस्थित होते. महाराजस्व अभियानांतर्गत या आदिवासींना मोठय़ा प्रतिक्षेनंतर शिधापत्रिका हातात मिळाल्या. यामुळे आमदार, जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकार्यांचे पाय प्रथमच या आदिवासी वस्तीत पडले. यावेळी सरपंच मैनाबाई आंग्रे, डॉ.सुनील गंधे, बबन गुलाब कर्डिले, बाबासाहेब भिसे उपस्थित होते.
(प्रतिनिधी)