नगर तालुक्यात पीक विम्याचा टक्का घसरला
By Admin | Updated: June 2, 2016 23:09 IST2016-06-02T23:00:40+5:302016-06-02T23:09:11+5:30
अहमदनगर : सन २०१५ या खरीप हंगामासाठी नगर तालुक्यातील ८ हजार ३४४ शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ६ कोटी ७८ लाख ५९ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

नगर तालुक्यात पीक विम्याचा टक्का घसरला
अहमदनगर : सन २०१५ या खरीप हंगामासाठी नगर तालुक्यातील ८ हजार ३४४ शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ६ कोटी ७८ लाख ५९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नगर तालुक्याला कमी पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. दुष्काळाशी गेल्या चार वर्षांपासून झुंजणाऱ्या नगर तालुक्याला यंदा कमी पीक विमा मिळाला आहे.
गेल्या चार वर्षांपासून पावसाअभावी नगर तालुक्यात खरीप पिकांचा हंगाम कोरडा गेला. यामुळे शेतकरी हवालदिल होते. यापूर्वी माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने नगर तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा मिळत होता.त्यामुळे दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा मोठा आधार वाटत होता. शेळके यांच्यासारखे प्रयत्न व पाठपुरावा कमी झाल्याने जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या तुलनेत नगर तालुक्याच्या वाट्याला कमी विमा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
तालुक्यात सर्वाधिक पीक विमा चास मंडलातील १ हजार ८०५ शेतकऱ्यांना २ कोटी ३० लाख ५७ हजार इतका मिळाला. त्या खालोखाल भिंगार मंडलातील १ हजार ५६५ शेतकऱ्यांना १ कोटी ७ लाख १५ हजार, रुईछत्तीसी मंडलातील १ हजार २४१ शेतकऱ्यांना १ कोटी ३ लाख ६६ हजार, केडगाव मंडलातील ७५ शेतकऱ्यांना ७० लाख ६४ हजार, वाळकी मंडलात ६५२ लाभार्थ्यांना ४७ लाख ४७ हजार, चिचोंडी पाटील मंडलातील ७११ शेतकऱ्यांना ४५ लाख १६ हजार, नागापूर मंडलात ७५१ लाभार्थ्यांना ३५ लाख १९ हजार, जेऊर मंडलात ३६६ शेतकऱ्यांना १३ लाख ३८ हजार, कापूरवाडी मंडलात ३८० शेतकऱ्यांना १३ लाख ८ हजार, नालेगाव मंडलातील ७५ शेतकऱ्यांना ३ लाख ४३ हजार रुपये पीक विमा मंजूर झाला आहे.
(प्रतिनिधी)