योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग हवा
By Admin | Updated: June 2, 2014 00:38 IST2014-06-02T00:30:58+5:302014-06-02T00:38:30+5:30
अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात.
योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग हवा
अहमदनगर : सरकारची कोणतीही योजना लोकहितासाठीच असते. ती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कामाचा भाग म्हणून तिची अंमलबजावणी करीत असतात. मात्र, तिचे यशापयश हे लोकसहभागावर अवलंबून असते. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम अशक्य आहे. त्यामुळे लोकांनी प्रत्येकवेळी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कवडे यांनी शनिवारी सायंकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी शासनाच्या योजना, अधिकारी, कर्मचार्यांची मानसिकता आणि राजकीय पुढार्यांचे सामाजिक योगदान आणि अगदी अवैध वाळूउपसापासून पाणलोटविकासापर्यंत विविध विषयांवर संपादकीय विभागाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांच्यासोबत कर्जतचे उपविभागीय अधिकारी मिश्रा हेही उपस्थित होते. आवृत्ती प्रमुख अनंत पाटील, सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे यांनी त्यांचे स्वागत केले. पाणलोटासाठी सरकारी अनेक योजना आहेत. परंतु लोकांनी पुढाकार घेतल्यास त्याला मूर्त स्वरूप येऊ शकते. योजनेत ग्रामस्थांचा सहभाग असला तर त्यात आपलेपणाची भावना निर्माण होते. ही भावना असेल तर योजना दीर्घ काळ टिकते. पूर्वी गावात रात्रीच्या वेळी गावकरीच गस्त घालून आपले संरक्षण करीत. पोलीस यंत्रणा असो नाही तर महसूल त्यांना मर्यादा आहेत. प्रत्येक काम सरकारने करावे अशी लोकांची भावना आहे. पण आपलेही उत्तरदायीत्त्व लोकांनी विरसता कामा नये. पूर्वी गावात रामायण, महाभारत, नवनाथाचे ग्रंथ वाचले जायचे. विविध माध्यमांतून लोकांना मार्गदर्शन होई. मात्र, आता टी.व्ही.मुळे मार्गदर्शनाचा प्रश्नच राहिला नाही. याचाही परिणाम होतो आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी) वाळूतस्करांवर कारवाई वाळू उपसा रोखण्यासाठी त्रिस्तरीय पथके नेमली आहे. मुख्य रस्त्यांवर चेक नाके आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही वाळू चोरी होते. ही वस्तुस्थिती आहे. ही रोखण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला मदत केली पाहिजे. तसे झाल्याशिवाय तस्करी रोखता येणार नाही. कारण प्रशासनालाही मर्यादा आहेत, असे ते म्हणाले. अनुकरण का होत नाही राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ही गावे जगाच्या नकाशावर आली आहे, ते केवळ लोकसहभागामुळेच. मात्र, हा लोकसहभाग वाढविण्यासाठी तेथील अण्णा हजारे व पोपटराव पवारांसारखे नेतृत्व पुढे आले. विकासात स्वयंप्रेरणा फार महत्त्वाची आहे. परंतु या गावांचीच उदाहरणे किती दिवस आपण देत राहणार. त्यांचा आदर्श घेऊन इतर गावे का अनुकरण करीत नाहीत. याचाही शोध घेतला पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.