साखर कामगारांना पेन्शन
By Admin | Updated: August 24, 2014 23:07 IST2014-08-24T22:53:45+5:302014-08-24T23:07:44+5:30
लोणी : येणाऱ्या काळात साखर कामगारांकरिता पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

साखर कामगारांना पेन्शन
लोणी : अनेक संकटे आली तरी सर्वांच्या सहकार्याने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना सुस्थितीत उभा आहे. सहकारी साखर कारखानदारीत सभासदांबरोबरच कामगारांनी दिलेले योगदान मोठे असून, येणाऱ्या काळात साखर कामगारांकरिता पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
साखर कामगार सभेच्या वतीने प्रवरानगर येथे विखे यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साखर कामगार सभेच्या वतीने विखे यांचा तलवार देऊन सत्कार करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. भास्करराव खर्डे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कडू, उपसभापती सुभाष विखे, पायरेन्सचे अध्यक्ष एम.एम. पुलाटे, कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, साखर कामगार सभेचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, अध्यक्ष ज्ञानदेव आहेर आणि संचालक उपस्थित होते.
सहकारी साखर कारखान्याची चळवळ ही कामगारांच्या भक्कम पाठबळावर उभी असल्याचे नमूद करून मंत्री विखे म्हणाले की, सहकारी चळवळीमुळेच परिसरात वैभव प्राप्त झाले. पद्मश्रींचा दृष्टिकोन यामागे वेगळा होता. शाश्वत विकासाचे मॉडेल हे शेतीतूनच उभे राहू शकते. यासाठी संशोधनाची गरज असून, शेतकऱ्यांमध्येच खरी प्रयोगशिलता असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ.विखे कारखान्याने ऊस वाढीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्यानेच उद्दीष्टाइतके गाळप करू शकलो. ब्राझीलने साखर उद्योगात भरारी मारली असल्याने प्रत्येक कृषी विद्यापीठातील २५ विद्यार्थी अभ्यासासाठी ब्राझीलला पाठविण्याचा विचार सरकारच्या वतीने सुर आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले़
सहकारी चळवळीमुळे सामाजिक दायित्व स्वीकारू शकलो. ही चळवळ राज्याने आणि देशाने स्वीकारली. नैसर्गिक संकटांचा सामना करतानाच उसाच्या उत्पादकतेसाठी आणि पाण्याच्या संघर्षासाठीही सज्ज व्हावे लागेल, असे ते म्हणाले.
याप्रसंगी साखर कामगार सभेचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, अण्णासाहेब म्हस्के, भास्करराव खर्डे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव आहेर यांनी केले. राहुल मधुकर चौधरी आणि भिमराज नागरे या कामगारांच्या मुलांचा सत्कार विखे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार प्रमोद रहाणे यांनी मानले.
(वार्ताहर)
गणेश साखर कारखान्याकडेही लक्ष
गणेश साखर कारखान्याचे भविष्यदेखील आता उज्ज्वल करायचे आहे. मुळा प्रवरा कामगारांची ६० कोटी रुपयांची देणी आतापर्यंत देण्यात आली असून, येणाऱ्या काळात उर्वरित प्रश्नही मार्गी लागतील. कामगारांसाठी पेन्शन योजना आणि कारखान्याच्या भागिदारीतून कामगारांच्या दहावीतील मुलांना लॅपटॉप देण्याचेही विखे यांनी सांगितले.