पहिल्या दिवशी गर्दीचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:30+5:302021-06-09T04:25:30+5:30
अहमदनगर : अनलॉकच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शहरातील कृषीसेवा केंद्रांसह बाजारपेठेतील गर्दीने उच्चांक गाठला. दरम्यान औरंगाबाद-पुणे महामार्ग, कोठी ते कृषी ...

पहिल्या दिवशी गर्दीचा उच्चांक
अहमदनगर : अनलॉकच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शहरातील कृषीसेवा केंद्रांसह बाजारपेठेतील गर्दीने उच्चांक गाठला. दरम्यान औरंगाबाद-पुणे महामार्ग, कोठी ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील प्रवेशव्दारापर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडी झाल्याने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत ग्राहक अक्षरश: घोळक्याने दुकानांसमोर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी बाजारपेठेत उसळलेली गर्दी आता सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे.
जिल्हा प्रशासनाने रविवारी दुपारी अध्यादेश काढून सोमवारपासून सर्व व्यवहार सुरळीत करण्याचे जाहीर केले होते. निर्बंध शिथिल करताना नागरिक स्वत:हून नियम पाळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच दिवशी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. शहरासह सावेडी, नालेगाव, दिल्लीगेट, बालिकाश्रम रोड, पाइपलाइन रोड, कुष्ठधाम रोड, मनमाड रोडवर वाहनांची एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्य बाजारपेठेत पूर्वीप्रमाणेच पायी चालणे कठीण झाले होते. दुकानातील सामानाची ने-आण आणि ग्राहकांची गर्दी, यामुळे बाजारपेठेला जत्रेचे स्वरुप आले होते. पथारीवाल्यांनी दुकानांसमोर लहान मुलांचे कपडे व इतर साहित्यांचे स्टॉल मांडले होते. कपडे व इतर वस्तू घेण्यासाठी ग्राहकांनी तोबा गर्दी केली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचेही भान कुणाला नव्हते. अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हता. कोरोना गेल्याच्या आविर्भावातच सर्व व्यवहार सुरू होते. एमजी रोड दुचाकी व पादचाऱ्यांनी भरून गेला होता. मोची गल्लीत पूर्वीसारखी रस्त्यात दुकाने थाटली होती. तिथे महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. चितळे रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नवीपेठेतही वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळाली. सर्जेपुरा परिसरातील दुकानांत दुचाकीचे साहित्य घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक दाखल झालेले होते. रस्त्यात वाहने उभी करून दुकानांत खरेदी जोरात सुरू होती. एकाच दुकानासमोर पाच ते सहा जण घोळक्याने उभे होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीत खते व बियाण्यांची विक्री सुरू होती. बाजार समितीत खते व बियाण्यांची वाहतूक करणारी वाहने आणि खरेदीसाठी आलेले शेतकरी, यामुळे गोंधळ उडाला होता. कृषी सेवा केंद्रांसमोर रांगा न लावता बियाणे व खतांची विक्री सुरू होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील प्रवेशव्दारासमोरील कोठी रस्त्यावर वाहतुुकीची प्रचंड कोंडी झालेली होती. पुणे महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक कोठीमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी झाली हाेती. एक तासाहून अधिक काळ वाहने एकाच जागेवर उभी होती. या कोंडीत दुचाकीस्वार अडकून पडले होते. बराच वेळ झाला तरी वाहतूक सुरळीत होत नव्हती. अखेर, काहींनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवजड वाहनांना पुढे सरकण्यासाठी थोडीही जागा नव्हती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न फसला.
....
नागरिकांचा संताप
पहिल्याच दिवशी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले. प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठेतही गर्दी झाली होती. अनेेेकजण गर्दीत अडकले. पहिल्याच दिवशी एवढी गर्दी झाल्याचे पाहून काहींनी संताप व्यक्त केला. पुन्हा लॉकडाऊन होईल, अशी भावना काहींनी व्यक्त केली.
...
सरकारी कार्यालये हाऊसफुल्ल
दोन महिन्यांनंतर सोमवारी सरकारी कार्यालये पूर्णक्षमतेने सुरू झाले. अभ्यागतांनी कामासाठी सरकारी कार्यालयांत गर्दी केली होती. त्यामुळे सरकारी कार्यालये पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाले होते.
....
दुकानदार समाधानी, पण गर्दीने चिंता वाढली
गेल्या दोन महिन्यांनंतर दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने दुकानदारांनी सकाळीच दुकाने उघडली. स्वच्छता करून विक्रीही सुरू झाली. त्यामुळे बाजारपेठेत समाधानाचे वातावरण होते. परंतु, दुकानांसमोर झालेल्या गर्दीने व्यापाऱ्यांची चिंता वाढली असून, गर्दी कमी करण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळे उपाय करण्यात आले होते. काहींनी प्रवेशव्दारावर रेबीन बांधली, तर काहींनी प्लास्टिक लावले आहे.