अकोले तालुक्यात मोरांचे दर्शन झाले दुर्लभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 02:53 IST2019-11-20T02:53:02+5:302019-11-20T02:53:07+5:30
प्रशासनाकडे निश्चित आकडेवारी नाही; शिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

अकोले तालुक्यात मोरांचे दर्शन झाले दुर्लभ
- मच्छिंद्र देशमुख
कोतूळ (जि. अहमदनगर) : अंगणांमध्ये कोंबड्यांबरोबर मोरही खेळताना पाहणारे अकोले तालुक्यातील ग्रामस्थ मोर गेले कुठे, या प्रश्नाने बैचेन झाले आहेत. सध्या मोरांचा प्रजनन काळ सुरू असताना त्याचा केकारव कुठेच ऐकू येत नाही. हमखास होणारे दर्शनही दुर्लभ झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.
अकोले तालुक्यात मोठी वनसंपदा असल्याने विविध प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. १९९९ ते २०१४ या कालखंडात अकोले तालुक्यात मोरांची संख्या झपाट्याने वाढली. तालुक्यात येणाºया प्रत्येक पर्यटकाला हमखास मोराचे दर्शन व्हायचे. प्रत्येक गावच्या शिवारात सकाळी होणारा मोरांचा केकारव गावकऱ्यांच्या अंगवळणी पडला आहे. शाळेत, रानात या आवाजाची हुबेहूब नक्कल करणारे लोकही आहेत. अनेक शेतकºयांना पेरणी, काढणीपर्यंत मोरांचा त्रासही व्हायचा. कोंबड्यांबरोबर मोरही अंगणात खेळायचे. मात्र असे चित्र सध्या कुठेच आढळून येत नाही.
तालुक्यात वन्यजीव व वन विभाग असे दोन विभाग प्राणी-पक्षीसंपदेसाठी काम करतात. वन्यजीव विभागात शेती असल्याने मोरांचा वावर कमी आहे. मात्र वन विभागाच्या कोतूळ, राजूर, अकोले, समशेरपूर या चारही परिक्षेत्राच्या कक्षेत बागायती शेती आहे.
टॉमॅटो, फळबागा, मका, भुईमूग, तेलबियांची शेती, मोठी झाडे व उन्हाळ्यात सहज पाणी उपलब्ध होते. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत मोरांची संख्या वाढली. समशेरपूर, विरगाव, गणोरे, तांभोळ, कळस, सुगाव, गर्दनी, इंदोरी, रूंभोडी, वीठा, म्हाळादेवी, चितळवेढे या बारमाही बागायती पट्ट्यात मोठ्या संख्येने मोर होते.
पेबई, चिंचवणे, वाशेरे, कळंब, पिसेवाडी, मन्याळे, अंभोळ, अबिटखिंड, सावरचोळ, वाघापूर, लिंगदेव, चिंचखांड शिवनदी या घाट परिसरात मोठ्या संख्येने मोर सकाळी आणि संध्याकाळी दिसायचे. मात्र हे दर्शन सध्या दुर्मीळ झाले आहे.
प्रशासनाकडे पक्षी गणना तक्ताच नाही
वन विभागाचे राजूर व अकोले परिक्षेत्राधिकारी तसेच संगमनेर येथील विभागीय वनाधिकारी यांच्याकडे गेल्या तीन वर्षांतील पक्षी गणना तक्ता मागितला. मात्र आमच्याकडे याबाबत कसलाही तक्ता उपलब्ध नसल्याचे अधिकाºयांनी लोकमतला सांगितले.
पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेने सध्या तालुक्यात फक्त दहा टक्के मोर आहेत. अवैध शिकार होत असल्याची शंका आहे. वन विभागाने कायदा व संवर्धन याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात.
- डॉ. आकाश देशमुख, पशुवैद्यक तथा पक्षी अभ्यासक