ताशा-संबळ वाजताच १७ लाखांचा भरणा
By Admin | Updated: February 23, 2016 23:30 IST2016-02-23T23:10:38+5:302016-02-23T23:30:23+5:30
अहमदनगर : दीडशे कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या घरासमोर मंगळवारी वाजंत्री वाजविली.

ताशा-संबळ वाजताच १७ लाखांचा भरणा
अहमदनगर : दीडशे कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या घरासमोर मंगळवारी वाजंत्री वाजविली. वाजंत्री दारात येताच थकबाकीदारांनी पैसे भरण्याची तयारी दर्शवीत मनपाच्या तिजोरीत १७ लाख ५० हजार रुपयांचा भरणा केला. बुरूडगाव प्रभाग समिती कार्यालयाने सारसनगर येथे साबळे यांचा नळजोड तोडला. वसुलीची कारवाई अशीच जोरदारपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी दिली.
नगरकरांकडे महापालिकेचा १३६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. ११ महिन्यात केवळ ३२ कोटी रुपयांचा वसूल झाला. शास्तीमाफीत सवलत देऊनही वसूल होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. या थकबाकीदारांच्या घरासमोर वाजंत्रीसह महापालिकेचे कर्मचारी वसुलीसाठी जात आहेत. मंगळवारी सावेडी व बुरूडगाव प्रभागात समितीने अशा प्रकारची वसुली मोहीम सुरू केली. बुरूडगाव समिती कार्यालयाने सारसनगर, टिळक रस्त्यावर तर सावेडी कार्यालयाने टॉपअप पेट्रोल पंप व मनमाड रस्त्यावरील व्यावसायिकांच्या दारात वाजंत्री वाजविली. पथक वाजंत्रीसह येताच थकबाकीदारांनी वसुली देण्यास सुरूवात केली. सावेडी प्रभाग समितीने ५ लाख तर बुरूडगाव प्रभाग समितीने साडेसात लाख रुपयांची वसुली दिवसभरात केली. बुरूडगाव प्रभाग समितीच्या दुसऱ्या पथकाने सारसनगरमधील साबळे यांचा नळजोड तोडला. बुधवारी महापालिकेची वसुली मोहीम अशीच सुरू राहणार असून महापालिकेचे कर्मचारी वाजंत्रीसह थकबाकीदारांच्या दारात पोहोचणार आहेत. नागरिकांनी महापालिकेला वसूल देऊन सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त बेहेरे यांनी केले आहे.
(प्रतिनिधी)