मिरीत व्यापारी संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:00+5:302021-06-29T04:15:00+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ...

मिरीत व्यापारी संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे अर्थसाहाय्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेनेही या ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
लवकरच प्रशस्त असे व्यापारी संकुल उभे राहणार आहे. गावातील अनेक बेरोजगार तरुणांना या माध्यमातून रोजगार मिळेल, असा विश्वास पंचायत समिती सदस्य राहुल गवळी व सरपंच आदिनाथ सोलाट यांनी व्यक्त केला.
ग्रामविकास निधीतून हे कर्ज मंजूर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांच्याकडे व्यापारी संकुलाच्या उभारणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, सरपंच आदिनाथ सोलाट, उपसरपंच अरुण बनकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी, संजय शिंदे, विजय गुंड, जालिंदर गवळी, संभाजी झाडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र साखरे आदी उपस्थित होते.
मिरी एक मोठे महसुली क्षेत्र असून येथे दररोज परिसरातील २५ गावातील लोकांची ऊठबस असते. या ठिकाणी ग्रामपंचायत मालकीची व महसूल क्षेत्राचीही मोठी जागा उपलब्ध आहे. व्यापारी संकुल उभे करून बेरोजगार तरुणांना व्यापारी संकुलात गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.