पोहेगाव येथील कोविड सेंटरमध्ये परिसरातील रुग्णांनी दाखल व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:03+5:302021-05-19T04:21:03+5:30
पोहेगाव ग्रामपंचायत, पोहेगाव नागरी पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड सेंटर ...

पोहेगाव येथील कोविड सेंटरमध्ये परिसरातील रुग्णांनी दाखल व्हावे
पोहेगाव ग्रामपंचायत, पोहेगाव नागरी पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. लोकसहभागातून सुरू झालेल्या या कोविड सेंटरसाठी परिसरातील व्यापारी, वकील, डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे, विविध गावातील संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी वस्तूस्वरूपात व आर्थिक मदतीचे धनादेश दिले आहेत. परिसरातील रुग्णांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोविड सेंटर सुरू झाल्यापासून मदतीचा ओघ वाढत आहे. सरपंच अमोल औताडे, ग्रामविकास अधिकारी रामदास काळे हे दररोज पारदर्शक पद्धतीने आलेल्या मदतीची आकडेवारी जाहीर करत आहे, अशी माहिती औताडे यांनी दिली.
पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बडदे यांच्यासह परिसरातील सर्व खासगी डॉक्टर्स स्वतःहून पुढे येत कोविड सेंटरमधील रुग्णावर उपचार करत असल्याने समाधान मिळत असल्याचेही औताडे यांनी सांगितले. कुटुंबातील व्यक्तीला ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी व इतर काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नितीन औताडे यांनी केले आहे.