पालिकेसाठी पाथर्डीत फिल्डिंग
By Admin | Updated: October 17, 2016 01:07 IST2016-10-17T00:39:06+5:302016-10-17T01:07:16+5:30
पाथर्डी : पाथर्डी पालिकेबरोबर नगराध्यक्ष निवडणूक तोंडावर आल्याने अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

पालिकेसाठी पाथर्डीत फिल्डिंग
पाथर्डी : पाथर्डी पालिकेबरोबर नगराध्यक्ष निवडणूक तोंडावर आल्याने अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. नगरसेवकपदासाठीही अनेक इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डींग लावली असून काहीजणांनी बैठका तसेच गाठीभेटीवर भर दिला आहे. नगरसेवक पदासाठी तिकीट देतांना सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.
पालिका निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरल्याने नगराध्यक्षपदासाठी इच्छूक उमेदवारांनी शहरातील प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. नेते पातळीवर या निवडणुकीबाबत सामसूम असली तरी नगराध्यक्षपदाचे तिकिट कोणाला द्यायचे यावर विचारमंथन सुरू आहे. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड कोणती भूमिका घेतात? याविषयी शहरात जोरदार चर्चा आहे. घुले-ढाकणे यांच्याकडून माजी नगरसेवक बंडू पा.बोरूडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यादृष्टीने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोर्चेबांधणी सुरू केली असून गाठीभेटीवर भर दिला आहे. बोरूडे यांच्याशिवाय डॉ.दीपक देशमुख इच्छूक असल्याचे कळते. माजी आमदार राजीव राजळे हे सध्या शांत असले तरी त्यांच्यासमोर अमोल गर्जे, नगरसेवक बजरंग घोडके व डॉ.मृत्यूंजय गर्जे ही नावे समोर आहेत. माजी नगराध्यक्ष आव्हाड व राजळे यांच्यात दिलजमाई घडविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आव्हाड-राजळे यांच्यात दिलजमाई झाल्यास भाजापकडून अभय आव्हाड नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील.
रामगिरबाबा आघाडीचे नेते सुभाष घोडके व राजळे यांच्यात आघाडी झाल्याचे बोलले जाते. त्याअनुषंगाने नगरसेवक बजरंग घोडके यांनीही गाठीभेटींवर भर दिला आहे. एकूण, नगराध्यक्षपदासाठी इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणी चालू केली आहे. (तालुका प्रतिनिधी)