सहजीवनाची उत्कट अभिव्यक्ती हा आशेचा किरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:25+5:302021-08-22T04:25:25+5:30
पुणे : ‘पत्नीविषयीचे प्रेम, जीवनात प्रत्येक टप्प्यावर पत्नीच्या उदात्त प्रेमाविषयी उत्कट कृतज्ञता, तिने दिलेला आनंद, संसार फुलवताना पत्नीचा त्याग, ...

सहजीवनाची उत्कट अभिव्यक्ती हा आशेचा किरण
पुणे : ‘पत्नीविषयीचे प्रेम, जीवनात प्रत्येक टप्प्यावर पत्नीच्या उदात्त प्रेमाविषयी उत्कट कृतज्ञता, तिने दिलेला आनंद, संसार फुलवताना पत्नीचा त्याग, योगदान याविषयी सर्व भावनांचे काव्यात्मक चित्रण कवितांमधून कवी गोपाळ अवटी यांनी केले
आहे. सहजीवनाच्या या छटांची अभिव्यक्ती सध्याच्या सामाजिक, कौटुंबिक वातावरणात आशेचा किरण आहे,’ असे उद्गार कवयित्री अरुणा ढेरे यांनी काढले.
आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ अवटी यांनी लिहिलेल्या ‘निळ्या सरोवराच्या काठाशी’ या काव्यसंग्रहाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. या घरगुती प्रकाशन सोहळ्यामध्ये कवी प्रदीप निफाडकर, कवी हिमांशू कुलकर्णी, साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी, गीतकार बाबासाहेब सौदागर, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविसकर यांनीही विचार मांडले. डॉ. अरुणा ढेरे, उत्तरा अवटी, प्रदीप निफाडकर, गौरी लागू, वैशाली कणसकर यांनी आणि गोपाळ अवटी यांनी या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे वाचन यावेळी केले.
काव्यसंग्रहाचे प्रकाशक नाशिकच्या ‘शब्दमल्हार’ प्रकाशनचे स्वानंद बेदरकर यांनीही भावना व्यक्त केल्या. गायिका कस्तुरी दातार अट्रावलकर यांच्या ठुमरी-गझल गायनाने या प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली. गौरी लागू यांनी सूत्रसंचालन केले.
--------
२१ पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) बाबासाहेब सौदागर, मिलिंद जोशी, अरुणा ढेरे, गोपाळ अवटी आणि उत्तरा अवटी.