मनमानीमुळे प्रवाशी वेठीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 01:20 IST2016-06-30T01:13:49+5:302016-06-30T01:20:37+5:30
श्रीरामपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे प्रवाशांना वेठीला धरले जात आहे. श्रीरामपूर एस. टी

मनमानीमुळे प्रवाशी वेठीला
श्रीरामपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे प्रवाशांना वेठीला धरले जात आहे.
श्रीरामपूर एस. टी. आगारामध्ये एका महिला वाहकाने याच आगारातील सहकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात विनयभंग, लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. यात एका चालकास अटकही झाली. तर वाहतूक नियंत्रकांनाही सहआरोपी करण्यात आले. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवून गुन्हा रद्द होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. महिला कर्मचाऱ्याने न्यायालयात आपण गैरसमजातून फिर्याद दिली असून ती मागे घेत असल्याचे लिहून दिले. पण नंतर पुन्हा तक्रारी सुरू केल्या. या प्रकरणानंतर श्रीरामपूर आगारातील वातावरण गढूळ झाले आहे. महिला वाहकांना ड्युटी देताना वाहतूक नियंत्रकांना अनेकदा विचार करावा लागतो. एका कर्मचाऱ्याच्या वर्तनाने इतरही महिला कर्मचाऱ्यांकडे संशयास्पद नजरेने पाहिले जात आहे. कामचुकार पुरूष कर्मचाऱ्यांना दरडावता येत असले तरी महिला कर्मचाऱ्यांना काही बोलल्यास त्यांचेच वाहतूक नियंत्रकांना ऐकून घ्यावे लागत आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊ व दहा वाजता सुटणाऱ्या श्रीरामपूर-पुणे या दोन्ही बस चालकांनी गाड्या फलाटावर लावल्या. पण त्यासाठी नेमलेल्या महिला वाहकांनी पालख्यांमुळे पुण्यात गर्दी असल्याचे कारण सांगत या बस पुण्यास नेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे दोन्ही बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना उतरावे लागले. काही जण काळ्या पिवळ्या जीपने गेले. तर काही जणांना दीड- दोन तास स्थानकातच तिष्ठत नंतरच्या बसची वाट पाहत उभे रहावे लागले. दीड तासाने हिरकणी बस फलाटावर लागली. पण या गाडीसाठी नेमलेल्या महिला वाहकानेसुद्धा पुण्यात पालखीची गर्दी असल्याचे सांगून ड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे वाहतूक नियंत्रक अन्सार शेख व देविदास कहाणे यांनी अखेर गणेशनगर बसमधून उतरलेल्या वाहकास पुणे बस घेऊन जाण्यास सांगितली. त्यानंतर तब्बल २ तास प्रवाशी ताटकळल्यानंतर पुणे बस मार्गस्थ झाली. (वार्ताहर)