पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात एमडी डॉक्टर नाही, व्हेंटिलेटर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:36+5:302021-09-13T04:20:36+5:30

लोकमत विशेष (असुविधा आरोग्याची भाग १) पारनेर : एम.डी. डॉक्टर नाही म्हणून व्हेंटिलेटर सुविधा, सीटी स्कॅन, वैद्यकीय अधिकारी नाही, ...

Parner’s rural hospital has no MD doctor, no ventilator | पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात एमडी डॉक्टर नाही, व्हेंटिलेटर नाही

पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात एमडी डॉक्टर नाही, व्हेंटिलेटर नाही

लोकमत विशेष (असुविधा आरोग्याची भाग १)

पारनेर : एम.डी. डॉक्टर नाही म्हणून व्हेंटिलेटर सुविधा, सीटी स्कॅन, वैद्यकीय अधिकारी नाही, अशा आरोग्याच्या असुविधा कोरोनाच्या महामारीच्या दोन वर्षांतही पारनेर ग्रामीण रुग्णालयात कायम आहेत.

ग्रामीण रुग्णालयात अतिशय महत्त्वाचे असणारे एम.डी. शिक्षण असलेले वैद्यकीय अधिकारी २०१३ पासून उपलब्ध नाही. केवळ एक ते दोन एमबीबीएस डॉक्टरवरच येथील ग्रामीण रुग्णालय अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र, आरोग्य सुविधांची माहिती घेतल्यावर असुविधांची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्या तेथे वैद्यकीय अधिकारी यांचीच वानवा आहे. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच सगळा ताण पडत आहे. सीटी स्कॅन मशीनही उपलब्ध नाही, तर परिचारिका कमी आहे. इतर सुविधा नाही.

---

गरोदर महिलांचे होतात हाल

ग्रामीण रुग्णालयात पूर्वी गरोदर महिलांची नियमितपणे तपासणी होऊन त्यांचे बाळंतपणही पारनेरमध्येच होत होती. सध्या वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ज्ञ असूनही अनेक गरोदर महिलांना थेट नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात, असे एक महिला सांगत होती.

---

अत्याधुनिक मशीन जिल्हा रुग्णालयाने पळविले

ग्रामीण रुग्णालयात आमदार नीलेश लंके यांनी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले होते. मात्र, येथे त्याचा वापर करण्यासाठी तज्ज्ञ माणूस नाही म्हणून ते व्हेंटिलेटर परत दिले. सुपा एमआयडीसीमधील मायडिया कंपनीचे प्रमुख पंकज यादव यांनी कंपनीच्या वतीने अत्याधुनिक पद्धतीने रक्त, लघवी नमुने तपासणीचे दिलेले मशीन येथे वापर होत नसल्याचे कारण सांगून जिल्हा रुग्णालयाने पळविल्याची माहिती आहे.

---

ग्रामीण रुग्णालयात अनेक लोक अद्यापही कमी आहेत. आमदार नीलेश लंके यांनी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र, व्हेंटिलेटर अधिकाऱ्यांनी स्वीकारले नाही. येथे १०० बेड ऑक्सिजन सुविधा उपलब्ध होत आहेत. मात्र, त्याचेही नियोजन व्यवस्थित झालेले नाही. अनेक पदे अद्यापही भरली नाही.

- डॉ. बाळासाहेब कावरे,

रुग्णालय समिती सदस्य, पारनेर

----

ग्रामीण रुग्णालयात एम.डी. डॉक्टर नसल्याने व्हेंटिलेटरची सुविधा नाही. सध्या तेथे ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. ग्रामीण रुग्णालय राज्य सरकारच्या कक्षेत असल्याने याबाबत आपण जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याबरोबर बोलावे.

- डॉ. प्रकाश लाळगे,

तालुका वैद्यकीय अधिकारी, पारनेर

Web Title: Parner’s rural hospital has no MD doctor, no ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.