पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:20+5:302021-08-21T04:25:20+5:30

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची स्वत:च्या आवाजातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, या निवेदनात त्यांनी आत्महत्या करण्याचा ...

Parner's female tehsildar warns of suicide | पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा

पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची स्वत:च्या आवाजातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, या निवेदनात त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांसह महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या क्लिपमध्ये देवरे यांनी आरोप केेले आहेत.

आत्महत्या केलेल्या विदर्भातील वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी या क्लिपमध्ये स्वत: निवेदन केले आहे. शुक्रवारी सकाळी ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात देवरे म्हणतात, ‘दीपाली घाबरू नकोस. मीही लवकरच येतेय तुझ्या वाटेवर तुला सोबत. कारण त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही’. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकारीही आपणाला त्रास देत असून, आपल्याविरुद्ध विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणे, ॲट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे कुभांड रचले जात आहे. तहसीलदार म्हणून कार्यकारी पदावर काम करताना पदोपदी अडथळे आणले जात आहेत. लोकप्रतिनिधी यांनी पोलीस निरीक्षकांसमोर एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली असतानाही त्यावर काहीच कारवाई होत नाही. आरोग्य विभागाच्या महिला अधिकाऱ्याची तक्रारही वरिष्ठ गांभीर्याने घेत नाहीत, असेही त्यांनी निवेदनात कथन केले आहे. अकरा मिनिटांच्या या क्लिपमध्ये देवरे या अनेकदा रडताना जाणवत आहे. देवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा शुक्रवारी प्रयत्न केला असता, त्या कार्यालयात नव्हत्या. भ्रमणध्वनीवरही संपर्क झाला नाही.

-----------

ही क्लिप देवरे यांचीच : जिल्हाधिकारी

सदरची ऑडिओ क्लिप ही पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांंचीच असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. देवरे यांनी आठ दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. व्हायरल क्लिपबाबत प्रशासन काय धोरण घेणार हे अजून ठरायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले ‘या क्लिपची सत्यता आम्ही पडताळून पाहत आहोत’.

................

हा देवरे यांचा बनाव: नीलेश लंके

तहसीलदारांनी ऑडिओ क्लिपमध्ये केलेल्या आरोपांबाबत ‘लोकमत’ने आमदार नीलेश लंके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, तहसीलदारांच्या कारभाराबाबत व भ्रष्टाचाराबाबत अरुण आंधळे हे उपोषणाला बसले होते. त्यानंतर, प्रशासनाने तहसीलदारांची चौकशी केली. यात भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले असून, याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांनी मंत्रालयात पाठविला आहे. कारवाई होईल, या भीतिपोटी ऑडिओ क्लिप व्हायरल करून त्यांनी बनाव केला आहे. यापूर्वीही त्यांनी रात्री-अपरात्री मला मेसेज पाठवून आत्महत्येची धमकी दिलेली आहे. सर्वच अधिकाऱ्यांवरही त्या आरोप करतात. सगळे चुकीचे व त्या एकट्या बरोबर कशा? मी महसूलमंत्र्यांकडे रीतसर त्यांची तक्रार यापूर्वीच केलेली आहे.

..........

देवरेंची वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबतही लेखी तक्रार

तहसीलदार ज्योती देवरे यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे १६ ऑगस्ट रोजी तक्रार पाठविली आहे. आमदार, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, तक्रारदार अरुण रोडे, अरुण आंधळे, धोंडीबा शेटे या व्यक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अडथळे आणून माझ्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी हे लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसार वागतात. आमदारांनी महसूलमंत्र्यांकडे आपल्या बदलीसाठी अर्ज दिला आहे. बदली झाल्यास आपले खच्चीकरण होईल, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

..................

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : फडणवीस

महिला अधिकाऱ्याला त्रासामुळे आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल, तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या महिला अधिकाऱ्याला दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

..............

Web Title: Parner's female tehsildar warns of suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.