पारनेर,श्रीगोंदा,जामखेडला वादळाचा तडाखा
By Admin | Updated: June 6, 2014 01:01 IST2014-06-05T23:55:13+5:302014-06-06T01:01:16+5:30
अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, शेवगाव, जामखेड भागाला बुधवारी सायंकाळी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
पारनेर,श्रीगोंदा,जामखेडला वादळाचा तडाखा
अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, शेवगाव, जामखेड भागाला बुधवारी सायंकाळी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडाली तर काही भागात फळांच्या बागा शेतात आडव्या झाल्या. यामध्ये शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मिरीत नुकसान पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मिरी भागात बुधवारी झालेल्या वादळामुळे अनेकांचे पत्र्याचे शेड उडाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. झाडे विजेच्या खांबावर पडल्याने काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी पाणी पुरवठाही विस्कळीत झाला आहे. रेणुकाईवाडी -शिराळ रस्त्यावर भैय्या शेख यांच्या छपरावर बाभळीचे झाड पडले. सुदैवाने प्राणहानी टळली. पत्रकार श्रीपाद मिरीकर, बापूराव वेताळ यांचे पत्र्याचे शेड उडाले. शेतामधील अनेकांची पत्रे व छपरे उडाली. सुदैवाने कोठेही जीवित वा वित्तहानी झाली नाही. जामखेडसह तालुका अंधारात जामखेड : वादळी वारे व पावसामुळे तालुक्यातील पंधरा ते वीस गावे प्रभावित झाली असून फळबागा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. चार ते पाच गावांमधील घरावरील पत्रे उडून गेले. वादळी वार्यामुळे विजेचे खांब पडल्याने बावीस तास जामखेडसह तालुका विजेपासून वंचित होता. बुधवारी खंडित झालेला वीज पुरवठा गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पूर्ववत झाला. खर्डा रस्त्यावरील बोराटे वस्तीनजीक रस्त्यावर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. महारुळी, नान्नज, गिरवली, पिंपळगाव आळवा, जामखेड-पाटोदा येथील घरावरील पत्रे उडाली. अरणगाव येथे गारपीट झाली. पिंपरखेड येथे पपई व डाळिंबाच्या सुमारे चार हेक्टर क्षेत्रातील बागांचे नुकसान झाले. फक्राबाद येथे शंभर कोंबड्या मृत पावल्या. कुसडगाव, हळगाव, नाहुली, राजुरी परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी तालुक्यात झालेला पाऊस- आकडे मि.मी. मध्ये - जामखेड २४, खर्डा २६, नान्नज ४३, अरणगाव ४३.५, नायगाव २४. कुळधरणमध्ये पत्रे उडाले कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण भागात बुधवारी वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले. पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कुळधरण येथील दत्तू गुंड,अप्पा सुपेकर, कोपर्डी येथील सीताराम सुद्रिक यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. कुळधरणनजीकच्या गुंडे वस्तीवरील घरावरील पत्रे वीजवाहक तारांवर पडल्याने तारा तुटल्या. कुळधरण येथील आजिनाथ गुंड यांची बाग जमीनदोस्त झाली. राक्षसवाडी, तळवडी, पिंपळवाडी भागात जनावरांचे गोठे जमीनदोस्त झाले. वादळाच्या तडाख्याने कर्जत तालुक्यातील कोपर्डी, धालवडी, राक्षसवाडी, पिंपळवाडी, तळवडी, दूरगाव, रेहेकुरी अभयारण्यातील शेकडो वृक्ष उन्मळून पडली. झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने जंगलाची मोठी हानी झाली आहे. करंजीत वादळ करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी, चिचोंडी भागात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मोठी झाडी उन्मळून पडली. नानाभाऊ क्षेत्रे, अनिल लगड यांच्या घरावरील पत्रे उडाली. खांडगाव येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम वांढेकर यांच्या फळबागांचे नुकसान झाले. महालक्ष्मी हिवरे येथील वाल्हाबाई वैरागर वृध्दाश्रमावरील सर्व पत्रे उडून गेले. शंकरवाडी येथील विलास घोरपडे, अशोक घोरपडे, संजय घोरपडे यांच्या घरावरील पत्रे उडाले. विजेचे खांब, तारा तुटल्याने अनेक गावे अंधारात आहेत. टाकळीमानूरमध्ये अनेक बेघर टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूरसह परिसरात झालेल्या वादळी वार्यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने ते बेघर झाले आहेत. झाडे, वीज, दूरध्वनी खांब पडले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन दूरध्वनी सेवाही विस्कळीत झाली आहे. या वादळामुळे तांबेवाडी येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. चुंभळी, अंबिकानगर, ठोंबरेवस्ती येथेही मोठे नुकसान झाले आहे. या वादळाची टाकळीमानूर येथील गुरुवारच्या आठवडे बाजारात चर्चा होती. असे वादळ यापूर्वी पाहिले नव्हते असे वयोवृध्दांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी, वार्ताहर) देवदैठण, मांडवगण, आढळगाव भागात पावसाचा कहर श्रीगोंदा : मांडवगण, आढळगाव परिसरातील गावांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. थिटेसांगवीत पोल्ट्री शेडची भिंत पडून बबई लहानू उगले (वय ६५) या महिलेचा मृत्यू झाला. तरडगव्हाण येथील भगवान डोके, नामदेव राजगुडे यांच्या घराचे छत उडून गेले.चोराचीवाडी येथील अरविंद कापसे यांचे पॉली हाऊसचे नुकसान झाले आहे. कोकणगाव, भावडी, टाकळीकडेवळीत,घोडगाव, हिरडगाव, चांदडगाव, शेडगावला वादळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.आढळगाव येथील बाळू गव्हाणे यांची गायी अंगावर खांब पडून गंभीर जखमी झाली. मनोज ढवाळ, दत्तात्रय चव्हाण, ज्ञानदेव लाळगे, महादेव लाळगे यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. साहेबराव मिसाळ यांच्या मिरचीचा फड उद्ध्वस्त झाला. (तालुका प्रतिनिधी)वादळाने गाव केले उजाड पारनेर : दुर्गम भागात राहताना सकाळी पुणे जिल्ह्यात मजुरीला जाऊन स्वत:ला राहण्यासाठी पत्र्याची घरे बांधली होती. कष्टाने उभी केलेली घरे मंगळवारी रात्री झालेल्या वादळाने उद्ध्वस्त झाली. ही काटाळवेढा या पारनेर तालुक्यातील दुर्गम गावाची अवस्था आहे. वादळ एवढं भयाण होते की सुमारे दीडशे घरांवरील पत्रे उडून काही जणांच्या भिंतीही पडल्या. वादळामुळे सारे गावच उजाड झाले आहे. मंगळवारी रात्री पारनेर तालुक्यातील अतिशय दुर्गम काटाळवेढा, डोंगरवाडी, पळसपूर, पोखरीसह परिसरातील गावांना वादळी पावसाने तडाखा दिला. काटाळवेढ्यात घरांच्या भिंती पडलेल्या व पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शंकर रावजी सरोदे घरावरील पत्रे अंगावर पडून जखमी झाले. तर कष्टाने घर उभारलेल्या यमुना तुळशीराम भाईक यांच्या घराची अवस्था पाहिल्यावर तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांच्यासह उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांचे मन हेलावून गेले. तशीच अवस्था बबन भाईक, दगडू गुंड, भाऊसाहेब गुंड यांची होती. ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. तहसीलदार डॉ. विनोद भामरे, गटविकास अधिकारी किरण महाजन, तालुका कृषी अधिकारी कुलकर्णी व सचिन शिंदे यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिल्यावर सुमारे दीडशे घरावरील पत्रे उडून गेले व घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. वादळाची भीषणता इतकी होती की तीस ते चाळीस वर्षापूर्वीची आंब्याची झाडे मुळासकट उन्मळून पडली. (तालुका प्रतिनिधी) १४६ कुटुंबे बेघर कर्जत : तालुक्याला दोन दिवसापूर्वी वादळी पावसाने निम्म्या तालुक्याला तडाखा दिला. फळबागा, पिके, घरांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. गारांबरोबर पावसानेही यावेळी हजेरी लावली. वादळी वार्यामुळे १४६ कुटुंब घरावरील पत्रे उडाल्याने बेघर झाले आहेत. मोठे जुने वृक्ष उन्मळून पडले. शेततळ्यांचे कागद फाटून भिंती पडल्या. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.