पारनेर बनलेय बिबट्याचे निवारा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:12+5:302020-12-13T04:35:12+5:30
पारनेर : जंगलात असणारा बिबट्या आता शहर, गावे, वाड्या वस्त्यांत दिसत आहे. पारनेर तालुक्यातील तीस-चाळीस गावांमध्ये सध्या बिबट्याचे वास्तव्य ...

पारनेर बनलेय बिबट्याचे निवारा केंद्र
पारनेर : जंगलात असणारा बिबट्या आता शहर, गावे, वाड्या वस्त्यांत दिसत आहे. पारनेर तालुक्यातील तीस-चाळीस गावांमध्ये सध्या बिबट्याचे वास्तव्य आहे. बिबट्याची संख्या वाढली असून पारनेर तालुका बिबट्यासाठी निवारा केंद्र बनले आहे.
पारनेर तालुक्यात पूर्वी जुन्नरकडून येणारे एक, दोन बिबटे निघोज, कळस, शिरापूर, अळकुटी, वाडेगव्हाण भागात दोन वर्षांपासून दिसत आहेत. आता मात्र बिबट्याची संख्या इतर गावांत वाढली असून शेतकऱ्यांना याचा त्रासही सहन करावा लागत आहे.
पारनेर शहराच्या सर्व बाजूंच्या वस्त्यांत बिबट्या वास्तव्य करीत आहे. चेडे वस्ती, गंधाडे वस्ती, डोंगरे वस्ती, पाटाडी मळा, कण्हेर ओहोळ, पानोली रस्ता, वरखेड मळा, जामगाव व लोणी हवेली रस्ता येथे किमान आठ ते दहा बिबटे असावेत. कान्हूर पठार (भागवत मळा), विरोली, करंदी, किनही, सिद्धेश्वरवाडी, पानोली, चिंचोली, वडनेर हवेली, वाडेगव्हाण-तानवडे मळा, हिवरे कोरडा, मुगशी, जामगाव, दैठणे गुंजाळ, गोरेगाव, डीकसळ, राळेगणसिद्धी, शहाजापूर, सारोळा आडवाई, शिरापूर, देवीभोयरे, बाबूळवाडे, रांधे, दरोडी, पुणेवाडी, वडगाव दर्या, पाडळी दर्या, निघोज, जवळा, सांगवी सूर्या, गांजीभोयरे, कोहोकडी, गुणोरे या गावांमध्ये दररोज बिबट्याचे दर्शन होते आहे.
----
बिबट्याचे माणसांवरील हल्ले वाढले..
बिबट्याच्या हल्ल्यात शिरापूर, लोणी मावळा परिसरातील दोन बालकांना जीव गमवावा लागला. पारनेर, लोणी हवेली, जामगाव, मुंगशी यासह अनेक भागांत बिबट्याने माणसांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.
----
पारनेर तालुक्यात बिबट्याची संख्या वाढली आहे. कुक्कुटपालन ज्या भागात जास्त तिथे बिबट्यांचा वावर अधिक आहे. कोंबड्या, कुत्रे हे बिबट्यांचे प्रमुख खाद्य झाले आहे. त्यामुळेही बिबट्यांची संख्या वाढत आहे.
-रावसाहेब कासार,
अध्यक्ष, वसुंधरा पर्यावरण संस्था, पारनेर