पारनेर : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर सोमवारी बारगळला.राष्ट्रवादी काँग्रेसचे गायकवाड यांच्याविरूद्ध त्यांच्याच पक्षाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या मदतीने अविश्वास ठराव आणला होता.अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी ११ वाजता बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस सभापती प्रशांत गायकवाड यांच्या व्यतिरिक्त एकही संचालक उपस्थित न राहिल्यामुळे अविश्वास ठराव बारगळला आहे. झावरे व गायकवाड गटात झालेल्या संचालकांच्या पळवापळवीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. गायकवाड यांच्यासह सहाय्यक निबंधक सूर्यवंशी, सहकार अधिकारी सुनील शेलुकर, प्रभारी सचिव शिवाजी पानसरे, तसेच कर्मचारी राजू चेडे हेच सभागृहात उपस्थित होते. पंधरा मिनिटे वाट पाहूनही एकही संचालक उपस्थित न राहिल्याने बैठकीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी इतिवृत्तात तशी नोंद केली. ठराव बारगळल्याचे जाहीर करून त्यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले.
पारनेर बाजार समिती : सभापती प्रशांत गायकवाड विरोधातील अविश्वास बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:35 IST