पारनेरकराचा पाकिस्तान हद्दीत प्रवेशाचा प्रयत्न : जवानांनी रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:31 IST2018-06-17T15:31:32+5:302018-06-17T15:31:57+5:30
तालुक्यातील पळशी येथील दुर्गम भागात राहणारा बाळू संभा शिंगटे (वय ५५) यांनी राजस्थानजवळील जैसलमेर ही भारतीय हद्द सोडून तीन किमी अंतरावरील पाकिस्तानच्या झिनझिनअली या गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला.

पारनेरकराचा पाकिस्तान हद्दीत प्रवेशाचा प्रयत्न : जवानांनी रोखले
विनोद गोळे
पारनेर : तालुक्यातील पळशी येथील दुर्गम भागात राहणारा बाळू संभा शिंगटे (वय ५५) यांनी राजस्थानजवळील जैसलमेर ही भारतीय हद्द सोडून तीन किमी अंतरावरील पाकिस्तानच्या झिनझिनअली या गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. त्यास जवानांनी शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले़ जवानांच्या सतर्कतेमुळे शिंगटे हे पाकिस्तानी जवानांपासून बचावले़
शिंगटे अडीच महिन्यांपासून पळशी या गावातून बेपत्ता आहेत़ राजस्थानमधील जैसलमेर येथे भारतीय लष्काराची छावणी आहे़ त्या परिसरातूनच सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावरच पाकिस्तानचा भाग सुरू होतो.पळशीचे शिंगटे फिरत फिरत थेट जैसलमेर पार करून पाकिस्तानच्या झिनझिनअली भागात पोहोचण्याच्या प्रयत्नात असतानाच भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांना शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले़ याबाबत जैसलमेर येथील जवानांनी त्यांची माहिती वायरलेसद्वारे पारनेर पोलीस ठाण्याचे दूरसंदेश पोलीस रमेश थोरवे यांना मोबाईलवरून कळविण्यात आली़ पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी याची माहिती सोशल मीडियावर टाकली. पोखरी येथील युवक प्रकाशसिंह राजभोज यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी थेट जैसलमेर येथील पोलीस आयुक्त गौरव यादव व बीएसएफचे कमांडर अरविंद चाराण यांच्याबरोबर संपर्क साधल्यावर त्यांनीही बाळू शिंगटे ही व्यक्ती जैसलमेर येथील लष्करी जवानांच्या ताब्यात असल्याचा दुजोरा दिला़ दरम्यान तिकडे हिंदीतून बाळू शिंगटे ऐजवी बाळू शिंदे असे आडनाव घेतले जाते.
पारनेर तालुक्यातील पळशी येथील बाळू शिंगटे ही व्यक्ती राजस्थानजवळील जैसलमेर परिसरात फिरत असताना भारतीय लष्काराच्या जवानांनी त्यांना पकडले असल्याचा संदेश पारनेरचे दूरसंदेश पोलीस रमेश थोरवे यांना आला होता़ बाळू शिंगटे गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसून मानसिक रुग्ण आहे़ यापूर्वीही तो घरातून निघून गेला होता, अशी माहिती समजली आहे़
-हनुमंत गाडे,
पोलीस निरीक्षक पारनेर