परमार्थ हा निष्काम सेवेचे प्रतिक
By Admin | Updated: August 3, 2014 01:09 IST2014-08-02T23:56:15+5:302014-08-03T01:09:54+5:30
संगमनेर : सर्वच गोष्टी स्वार्थासाठी करायच्या नसतात. निस्वार्थ भावनेने अंत:करणातून केलेला परमार्थ हा शुध्द व कल्याण करणारा असतो.
परमार्थ हा निष्काम सेवेचे प्रतिक
संगमनेर : सर्वच गोष्टी स्वार्थासाठी करायच्या नसतात. निस्वार्थ भावनेने अंत:करणातून केलेला परमार्थ हा शुध्द व कल्याण करणारा असतो. परमार्थ हा निष्काम सेवेचे प्रतिक आहे. म्हणून प्रत्येकाने सप्ताहाची सेवा निस्वार्थ भावनेने करावी, असे आवाहन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्रीक्षेत्र तळेगाव दिघे येथे १६७ व्या सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचनाद्वारे उपदेश करताना ते बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ़ डॉ. सुधीर तांबे, डॉ. हर्षल तांबे, अनुराधा नागवडे, रणजित देशमुख आदी उपस्थित होते. रामगिरी महाराज म्हणाले, भगवंताची प्राप्तीसाठी दहा जन्म घालावे लागतात. परमार्थ करणाऱ्यांची संख्या मात्र कमी होत चालली आहे. पाप हे दृष्टीतून मनात येत असते. त्यासाठी दृष्टी स्वच्छ असणे आवश्यक असते. परमार्थ व साधना करताना संस्कार हे नेहमीच मनात येतात. कर्म, क्रोध व लोभ हे तीन विकार नरकाचे द्वार आहेत. मनुष्य विकाराच्या आधीन होत जातो. धर्मावर टीका करण्याचा अधिकार कुणालाच नाही. ज्याच्याकडे योग्यता आहे तोच शस्त्र व ग्रंथाचा अभ्यास करु शकतो. संत हे दुर्जनातील दुर्जनपणाच दूर करतात. दु:ख पचविल्याशिवाय सुख मिळत नाही, असेही ते म्हणाले.
सप्ताह अविस्मरणीय होण्यासाठी गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज व रामगिरी महाराज यांचे आशिर्वाद महत्वाचे असल्याचे सांगून भाविकांनी स्वच्छता राखावी, असे आवाहन थोरात यांनी केले. यावेळी भाऊसाहेब कुटे, बाळासाहेब गायकवाड, नवनाथ महाराज आंधळे, अविनाश सोनवणे, सचिन दिघे, सरपंच मीना इल्हे, आरती दिघे, अर्चना बालोडे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, नामदेव दिघे, प्रभाकर कांदळकर, सतीश कानवडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले़ (प्रतिनिधी)