पारनेरकरांची मदार एमआयडीसीच्या पाण्यावर

By Admin | Updated: November 29, 2014 00:00 IST2014-11-28T23:57:28+5:302014-11-29T00:00:53+5:30

पारनेर : पारनेर शहराला पाणीपुरवठा करणारा सोबलेवाडी येथील तलाव नोव्हेंबरमध्येच कोरडाठाक पडला आहे.

Paneerkar's Madar on MIDC water | पारनेरकरांची मदार एमआयडीसीच्या पाण्यावर

पारनेरकरांची मदार एमआयडीसीच्या पाण्यावर

पारनेर : पारनेर शहराला पाणीपुरवठा करणारा सोबलेवाडी येथील तलाव नोव्हेंबरमध्येच कोरडाठाक पडला आहे. तर मनकर्णिका नदीजवळील विहिरीचे पाणीही संपले आहे. आता पारनेर शहराची तहान हंगा तलाव भागवत आहे. मात्र त्या हंगा तलावातही अवघा महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने जानेवारीपासून पारनेर शहरवासीयांना सुपा औद्योगिक वसाहतीकडून मिळणाऱ्या विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.
पारनेर शहराची लोकसंख्या सुमारे २२ हजार आहे. पारनेर ग्रामपंचायतीच्या वतीने शहरातील अठरा व संभाजीनगर परिसरातील सहा विभागात पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येच्या मानाने दररोज आठ लाख लीटर पाण्याची गरज आहे. सध्या हंगा तलावात पाणीसाठा उपलब्ध आहे. सुमारे पाच ते सहा किलोमीटरवरुन पाणी योजना आणल्याने या योजनेतच एक लाख लीटर पाणी वाया जाते. शिवाय पाईपलाईनमध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक राहते. गावातील पाणी साठवण टाक्या विचारात घेतल्या तर सहा ते सात लाख लीटर पाणी शहरासाठी साठविले जाते. शहरामध्ये सुमारे २६०० कुटुंब राहतात. पण त्यापैकी फक्त १३०० कुटुंबांनीच ग्रामपंचायतीचे नळ जोड घेतले आहे. सध्या तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. पण नळाला मीटर नसल्याने व नळाला तोट्या नसल्याने अनेक नागरिकही पाणी भरुन झाल्यावर रस्त्यावर पाणी सोडून देतात, असे चित्र बोळकोबा गल्ली, मुख्य शिवाजी पेठ, कोर्ट गल्ली या परिसरात पहावयास मिळते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. पारनेर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सात ते आठ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व बाहेरुन येणारे दररोज दोन तीन हजार प्रवासी यांच्यासाठीही शहराला पाण्याची गरज भासते. त्यामुळे आता हंगा तलावातील पाणीसाठा संपला की मुळा धरणातून सुपा एम.आय.डी.सी.ला होणाऱ्या पाणी पुरवठ्यातून पारनेर ग्रामपंचायत पाणी विकत घेणार आहे़ त्यासाठी पारनेरपर्यंत पाणीपुरवठा योजना केली आहे. त्यामुळे पारनेर ग्रामपंचायतीला महिन्याला सुमारे दीड लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, तांत्रिक बाबींचा विचार केल्यास पारनेरकरांना पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Paneerkar's Madar on MIDC water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.