सकारात्मक विचारातून पंडोरे कुटुंबाने केली कोरोनावर मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:51+5:302021-05-01T04:18:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र या आजारात मृत्यू होऊन प्रसंगी आपलाही ...

सकारात्मक विचारातून पंडोरे कुटुंबाने केली कोरोनावर मात!
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र या आजारात मृत्यू होऊन प्रसंगी आपलाही शेवट होऊ शकतो, या धास्तीने सध्या सर्वांच्याच मनावर तणाव आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही उपचारादरम्यान काही मृत्यूदेखील झाले आहेत.
वास्तविक, या आजारावर मात करण्यासाठी सर्वांत पहिले मानसिकदृष्ट्या खंबीर राहून वेळेत तपासणीसह औषधोपचार घेत सकारात्मक विचार केल्यास निश्चितच आपण यातून बाहेर पडू शकतो. अशाच पद्धतीने कोपरगावातील रिक्षाचालक अनिल पंडोरे व त्यांची पत्नी पूजा पंडोरे यांनी लॉकडाऊन व कोरोना या दुहेरी संकटावर मात केली आहे. याचीच ‘लोकमत’ने ‘कामगार दिना’निमित्त घेतलेली सकारात्मक दखल.
कोपरगाव शहरातील मोहिनीराजनगर परिसरात अनिल पंडोरे, पूजा पंडोरे हे आपल्या सात वर्षीय मुलगा संग्राम व दुसरा पाच वर्षीय मुलगा श्रेयस यांच्यासोबत राहतात. अनिल पंडोरे हे मालवाहू रिक्षा चालवून प्रसंगी हमाली करून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. हमाली व रिक्षा चालवून पंडोरे कुटुंबाची गुजराण सुरू असतानाच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ एप्रिलला राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. आता कुटुंब कसे चालवायचे, या विवंचनेत असतानाच अनिल व पत्नी पूजा यांना सर्दी, ताप व अंगदुखीचा त्रास होऊ लागला. त्यावर वेळ न दवडता त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली. त्यात दोघेही बाधित आले. क्षणभर काहीच न सुचल्याने दोघेही तेथेच रडू लागले. त्यावर थोड्या वेळाने स्वतःला सावरत आपणच खचलो तर आपल्या मागे असलेल्या दोन मुलांचे काय होईल? त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला हरवायचेच आहे, असा निश्चय करून घरी न येता ते सरळ कोविड केअर सेंटर गाठून भरती झाले. तेथेही औषधोपचार घेत असताना दोन दिवस खूप त्रास झाला. मात्र याही परिस्थितीत घाबरलो तर ऑक्सिजन कमी होईल, धावपळ होईल.. असा संयम राखत दोघांनी एकमेकांना आधार देण्याचे काम केले. तसेच मोठी वहिनी, मित्र परिवार यांनीदेखील त्यांना खूप मोठा मानसिक आधार दिला.
धार्मिक वृत्तीचे असतानाही प्रसंगी उपवास सोडून देत मिळेल त्या अन्नातून पोट भरत राहिले. प्रसंगी सेंटरमधील इतरही लोकांना आधार देण्याचे काम केले. सात दिवसांच्या उपचारानंतर घरी आल्यावरदेखील आयुर्वेदिक काढे, गरम पाणी, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करीत राहिले. तसेच फळांचा आहार वाढविला. याच दरम्यान त्यांच्या दोनही मुलांना ताप आला; परंतु दोन दिवसांत ते दोघेही ठीकठाक झाले. सद्य:स्थितीत पंडोरे कुटुंबीय कोरोनावर मात करून पुन्हा एकत्र येऊन आनंदात एकत्रित राहत आहेत.
......
आमचा प्रपंच रिक्षा व हमाली करून मिळणाऱ्या पैशांतून चालतो. लॉकडाऊन झाला तेव्हा चिंता वाढली. त्यातच आम्हाला दोघांना कोरोना झाला. मग तर हातपायच गळाले. यात थोडंसं भाऊकदेखील झालो. परंतु न डगमगता मुलांना डोळ्यांसमोर आणून सकारात्मक विचार केला. वेळेत केलेले निदान आणि त्यानुसार घेतलेले औषधोपचार यातून आम्ही दोघांनी कोरोनाला अखेर हरविले आहे. आतातर एवढा आत्मविश्वास तयार झालाय की, कोरोनाबाधित रुग्णांचे आम्ही समुपदेशनसुद्धा करू शकतो. ‘कोरोनाला घाबरायचे नाही, तर त्याच्याविरुद्ध लढायचे,’ हा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
- अनिल पंडोरे, पूजा पंडोरे - कोपरगाव