‘पंचायत राज’मुळे लोकशाही बळकट
By Admin | Updated: August 14, 2014 01:49 IST2014-08-14T01:27:21+5:302014-08-14T01:49:09+5:30
नेवासा : पंचायत राज व्यवस्थेने देशाची लोकशाही बळकट करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांनी केले.

‘पंचायत राज’मुळे लोकशाही बळकट
नेवासा : पंचायत राज व्यवस्थेने देशाची लोकशाही बळकट करण्याचे काम केले. आम्ही देखील पंचायत राज व्यवस्थेमध्ये २० वर्षे काढली. त्यामुळे पाळमुळं घट्ट झाली. कितीही संकटे आली तरी आम्ही त्यामुळे डगमगलो नाही. नेवासा पंचायत समितीची नूतन इमारत ही नेवासा शहराच्या वैभवात भर घालणारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांनी केले. राजकारणामध्ये डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. इमारत उद्घाटनावरून मंगळवारी झालेला प्रकार दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त कली.
नेवासा येथील पंचायत समितीच्या सुमारे १ कोटी ९८ लाख खर्चाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि.१३) रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेप्रसंगी यशवंतराव गडाख हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गडाख म्हणाले की, पंचायत राज व्यवस्थेने देशाला व महाराष्ट्राला खूप मोठी माणसे दिली. मंत्रिमंडळातील मंत्री हे देखील पंचायत राज व्यवस्थेतूनच गेले. त्यांना प्रशासनाचा अनुभव होता म्हणून ते यशस्वीही झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीने समाजाचे भान ठेवूनच काम केले पाहिजे. आम्ही काम करत असताना आम्हीही विरोधकांना सामोरे गेलो, पण ते विचाराने, कधी कुणाचा द्वेष केला नाही की, भांडलो नाही. राजकारणातही पथ्ये व संस्कृती पाळली गेली पाहिजे. जुन्या पिढीने आम्हाला बाळकडू दिले म्हणूनच आम्ही संस्था जपतो व चांगल्या पद्धतीने चालवितो. चांगल्या कामाला विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, असा मौलिक सल्ला देऊन पाटपाण्याच्या प्रश्नासंदर्भात सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नरेंद्र घुले पाटील म्हणाले, आमदार शंकरराव गडाख यांनी विकासाची दालने जनतेसाठी खुली करण्यासाठी काम केले. तरुणांना प्रोत्साहित करून विकासाचा गाडा चालविण्याचा प्रयत्न अहोरात्र केला. जनतेशी प्रामाणिक राहून काम केले म्हणून मोठे यश संपादन केले असल्याचे गौरवोद्गार आ. गडाख यांच्याबद्दल काढले.
आ.शंकरराव गडाख म्हणाले, मी आमदार झाल्यापासून कधीही जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जाऊन लुडबुड केली नाही. ते मलाही पसंत नाही. पंचायत समिती प्रांगणात उभारलेली प्रशासकीय इमारत जिल्ह्यात कुठेही नाही. पाठपुरावा करून काम करीत राहणे हेच माझे काम असल्याने निवडणूक होईपर्यंत विरोधकांबद्दल मी कधीही अपशद्ब वापरणार नाही. जेवढे विरोधक शिव्या देतील तेवढे माझे काम मी करीतच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार धरणाचे पाणी राखीव केले आहे. भांडून रोटेशन आणण्याचा माझा प्रयत्न राहणार असून, अडचणीवर मार्ग काढून पाणी आणून दाखवेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची भाषणे झाली. सभापती कारभारी जावळे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास उपसभापती कारभारी चेडे, भैय्यासाहेब देशमुख, विश्वासमामा गडाख, जि.प. सदस्य सुनील गडाख, सा.बां. उपाभियंता संजीवकुमार कोकणे, काशिनाथ नवले, निवृत्ती दातीर, कडूबाळ कर्डिले, रामभाऊ जगताप, नंदकुमार पाटील, शंकरराव लोखंडे, शिवाजीराव टेकावडे, तुकाराम मिसाळ, अण्णासाहेब सोनवणे, अशोक चौधरी, अॅड.देसाई देशमुख, भाऊसाहेब मोटे, भागिरथी शिंदे, विमलताई बहिरट, सविता शिंदे, काकासाहेब शिंदे, राजेंद्र गुगळे, शंकरराव भारस्कर, नानासाहेब तुवर आदी उपस्थित होते. अॅड. के. एच. वाखुरे यांनी सूत्रसंचालन केले. पी.आर. जाधव यांनी आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)