टँकर गेले कुण्या गावा ? पागीरवाडी म्हणते, टँकर अवतरतो अवकाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:25 IST2019-05-11T16:23:05+5:302019-05-11T16:25:28+5:30
तालुक्यातील तहानलेल्या मुथाळणे गावातील पागीरवाडीला गेल्या दीड महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे़ येथे वेळेत कधीच टँकर येत नाही़

टँकर गेले कुण्या गावा ? पागीरवाडी म्हणते, टँकर अवतरतो अवकाळी
हेमंत आवारी
अकोले : तालुक्यातील तहानलेल्या मुथाळणे गावातील पागीरवाडीला गेल्या दीड महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे़ येथे वेळेत कधीच टँकर येत नाही़ अचानक गावात टँकर आला की, पाणी भरण्यासाठी सार्वजनिक विहिरीवर ग्रामस्थांची झुंबड उडते़
शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी गावात टँकर आला़ या टँकर चालकाकडे ‘लॉग बुक’ नव्हते़ पाणी भरण्यासाठी गावातील सार्वजनिक विहिरीवर एकच झुंबड उडाली होती. याच वेळी रानातून आलेली गुरंही विहिरीवर पाणी पिण्यासाठी आले होते.पाण्यासाठीचा गलका वाढत गेला. वीस पंचवीस मिनिटांनी १० हजार लिटरचा टँकर विहिरीत रिता झाला आणि गावकऱ्यांची पाणी शेंदण्याची लगबग वाढली. गुरुवारी दुपारी टँकर आला होता. सायंकाळपर्यंत विहिरीत पाण्याचा टिपूस राहिला नव्हता. टँकर कधीच वेळेवर येत नाही.
मध्यंतरी चार पाच दिवस पाण्याचा टँकर गावात आलाच नव्हता तेव्हा ग्रामस्थांचे फार हाल झाले. वाडीला टँकर मुक्ती मिळण्यासाठी ठोस उपाय योजना व्हावी अशी अपेक्षा रानुबाई सदगीर, बीजलाबाई सदगीर, बंडु सदगीर, अविनाश सदगीर, रामनाथ सदगीर, मदन सदगीर आदी गावकऱ्यांनी व्यक्त केली.