पाडळी शाळा इमारत होणार जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:48+5:302020-12-22T04:20:48+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव पाडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ओलांडलेल्या चार वर्गखोल्यांच्या निर्लेखन प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने सरत्या वर्षात ...

पाडळी शाळा इमारत होणार जमीनदोस्त
सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव पाडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ओलांडलेल्या चार वर्गखोल्यांच्या निर्लेखन प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने सरत्या वर्षात त्या खोल्या जमीनदोस्त होणार आहेत. त्यामुळे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळेसाठी अवघ्या तीन वर्गखोल्या राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये यासाठी गावातील मंदिर, समाजमंदिर किंवा खासगी ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
शाळेची जुनी धोकादायक झालेली ही इमारत, दगड, मातीपासून बांधलेली असून, प्रत्येकी दोन वर्गखोल्या अनुक्रमे १९५८ व १९६० साली बांधण्यात आल्या होत्या. या शाळेच्या माध्यमातून गेल्या सहा दशकांत अनेक गुणवंत, हुशार विद्यार्थी व त्यांचे भवितव्य घडविण्यात गुरुजनांना यश आले. आता मात्र ही इमारत धोकादायक झाली आहे. तिचे निर्लेखन होणे गरजेचे होते. अशा वर्गखोल्यांत विद्यार्थ्यांना बसविणे धोकादायक आहे. त्यामुळे जुनी इमारत पाडण्यास परवानगी द्यावी, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
त्यानंतर जिल्हा परिषदेने निर्लेखन प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे चार वर्गखोल्या जमीनदोस्त होणार आहेत. यामुळे मुख्याध्यापक बाबाजी नरसाळे, पोपटराव नांगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश दावभट, रावसाहेब सिनारे व ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले.
पाडळी येथे पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गाचा ६७ पट आहे. सध्या चार शिक्षक त्यांना शिकवितात. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बाळासाहेब सिनारे यांनी गतवर्षी एका शिक्षकाची नेमणूक करून त्याचे मानधन व विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले.
---
नव्या चार खोल्या हव्यात..
नवीन चार वर्गखोल्यांसाठी निधीची गरज असून, खासगी शाळेप्रमाणे मूलभूत सुविधा त्या पद्धतीच्या अन्य सुविधा नसल्या तरी आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किमान निवारा तरी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.
फोटो २१ पाडळी शाळा
पाडळी येथील साठ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली प्राथमिक शाळेची इमारत.