पाचेगाव पाणी योजना अडकली न्यायालयीन वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:38+5:302021-02-25T04:25:38+5:30
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव पाणी योजनेच्या टेंडर प्रक्रियेचा घोटाळा उघडकीस आला होता. यानंतर जिल्हा परिषदेतील चौकशी समितीने अहवाल ...

पाचेगाव पाणी योजना अडकली न्यायालयीन वादात
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव पाणी योजनेच्या टेंडर प्रक्रियेचा घोटाळा उघडकीस आला होता. यानंतर जिल्हा परिषदेतील चौकशी समितीने अहवाल सादर केला होता. त्याला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. मात्र या पाणी योजनेची टेंडर प्रक्रियाच आता न्यायालयीन वादात सापडली आहे. यामुळे योजनेबाबत ग्रामस्थात संभ्रम निमार्ण झाला आहे.
योजनेतील संबंधित ठेकेदार हेमंत शेरकर यांनी महाराष्ट्र शासनाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात १२ जानेवारीला अर्ज दाखल केला होता. सदर अर्जात ग्रामपंचायत पाचेगाव आणि संकेत इंटरप्राईसेस यांना प्रतिवादी करण्यात आले होते. मंगळवारी या अर्जाच्या पहिल्या सुनावणीत आपली बाजू मांडण्यासाठी वरील सर्वाना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार होती, परंतु ती काही कारणास्तव पुढे ढकलली आहे.
...
काय होती ही योजना?
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी योजना मंजूर झाली होती. १ कोटी ४५ लक्ष रुपयांच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने टेंडर मागविण्यात आले होते. एका ठेकेदाराने सर्वात कमी १ कोटी २० लाख रुपयांचे (उणे ३ टक्के) ऑनलाईन टेंडर भरल्यानंतर ते मंजूरही करण्यात आले होते. मात्र टेंडर प्रक्रियेत ज्या ठेकेदाराने अधिक रकमेची निविदा भरली होती. त्यालाच कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.
....
७०० टेंडरच्या चौकशी अहवाल
या योजनेबाबत तक्रार प्राप्त होताच जिल्हा परिषदेकडून विभागातील सर्व टेंडर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह अन्य विभागातील तब्बल ७०० टेंडरच्या चौकशी अहवाल २ मार्च २०१९ रोजी सादर करण्यात आला. हा अहवाल सादर होण्याला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत.
...
पाचेगावच्या पाणी योजनेबाबत ग्रामपंचायतीने पाच वर्षे वारंवार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. ही योजना मंजूर होऊनही न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. यामुळे ही योजना पूर्ण होईल की नाही, अशी संभ्रमावस्था ग्रामस्थ व पदाधिका-यात निर्माण झाली आहे.
-श्रीकांत पवार, उपसरपंच, पाचेगाव.
...