अतिवृष्टीचा जबर तडाखा

By Admin | Updated: September 1, 2014 00:03 IST2014-08-31T23:53:09+5:302014-09-01T00:03:52+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अतिवृष्टीमुळे संगमनरेमधील नुकसानीतून जिल्हा सावरलेला नसताना गेल्या २४ तासात पुन्हा एकदा पावसाने फटका दिला आहे.

Overwhelm | अतिवृष्टीचा जबर तडाखा

अतिवृष्टीचा जबर तडाखा

अहमदनगर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अतिवृष्टीमुळे संगमनरेमधील नुकसानीतून जिल्हा सावरलेला नसताना गेल्या २४ तासात पुन्हा एकदा पावसाने फटका दिला आहे. नेवासा तालुक्यात यामुळे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील वाटापूर, गोमळवाडी, तामसवाडी या परिसरात अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्याचे पाणी गावांसह शेतात शिरल्याने लाखोंचे नुकसान झाले. १२० मेंढ्या, २ घोडे आणि १६ शेळ्या नाल्याच्या पुरात वाहून गेले. नेवासा शहरात नाल्याचा पूर वस्तीच घुसल्याने अनेक घरे पाण्याखाली होती. नगरमध्येही अनेक घरात पाणी शिरले. दरम्यान, नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला सात वर्षात पहिल्यांदाच पूर आला. दरम्यान, नुकसानग्रस्त भागात प्रशासनाकडून रात्रभर मदतकार्य सुरु होते.
नेवासा तालुक्यातील वडाळा, घोडेगाव, सोनई या परिसरात भरपूर पाऊस झाल्याने या परिसरातील पाणी ओढ्या नाल्याद्वारे वाटापूर, तामसवाडी, गोमळवाडी या परिसरात शिरले. यामध्ये घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. शेतात पाणी शिरून पिकांचेही नुकसान झाले. यात १२० मेंढ्या, १६ शेळ्या, २ घोडे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे या परिसरातील आपद्ग्रस्तांनी तहसीलदारांच्या पथकाला सांगितले.
पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यासाठी तहसीलदार हेमा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल वाईज आठ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
या पावसात गोमळवाडी येथील ज्ञानदेव रमेश कोळपे यांची एक मोठी व एक लहान घोडी पाण्यात वाहून गेली तसेच ५० मेंढ्या, १६ शेळ्याही वाहून गेल्या आहेत. सावळेराम बापूराव कोळपे यांच्या ५० मेंढ्या तर लक्ष्मण चिमाजी तमनर यांच्या २० मेंढ्या वाहून गेल्या आहेत. याचबरोबर परिसरातील अनेकांची जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तामसवाडी, गोमळवाडी, वाटापूर या परिसरात अनेक घरांची पडझड झाली आहे.
घोड ओव्हरफ्लो
श्रीगोंदा : नगर-पुणे जिल्ह्यातील ६५ गावांना वरदान ठरणारे घोड धरण रविवारी संध्याकाळी ८ वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून कार्यकारी अभियंता यादवराव खताळ यांचे हस्ते २ हजार ४०० क्युसेसने घोड नदीत पाणी सोडले आहे. धरण भरल्याची चाहूल लागताच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जल्लोष केला.
घोड धरणाची क्षमता ५ हजार ६३९ एमसीएफटी असून, डेड स्टॉक २ हजार १७२ एमसीएफटी आहे. उपयुक्त पाणी साठा ५ हजार ४६७ एमसीएफटी आहे. धरण १०० टक्के भरल्याने शेतकऱ्यांची कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता दूर झाली आहे. घोड धरणाच्या लाभक्षेत्रात शिरूर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील ६५ गावातील ५२ हजार ३७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. (तालुका वार्ताहर)
४३ वेळा घोड भरले
धरण पूर्ण झाल्यानंतर ४९ वर्षाच्या कालखंडात ४३ वेळा घोड धरण १०० टक्के भरले. १९७७, १९८५, १९८६, २००१, २००३, २०१२ या वर्षी घोड धरण १०० टक्के भरले नव्हते.
घोड धरण रविवारी रात्री ८ वाजता भरल्यानंतर चार दरवाजांद्वारे २ हजार ४०० क्युसेसने घोड नदीत पाणी सोडले आहे. सोमवारपासून ५ ते ६ हजार क्युसेसने पाणी सोडणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर केला तर मे २०१५ पर्यंत पुरेल.
-यादवराव खताळ
कार्यकारी अभियंता, श्रीगोंदा
ठेकेदारावर कारवाईची मागणी
ब्रिटिश पुलाशेजारीच नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचा स्लॅब टाकताना ओढ्याच्या तळापासून आधार द्यावयास पाहिजे होता. मात्र सदरच्या ठेकेदाराने पैसे वाचविण्यासाठी ओढ्याचे पूर्ण पात्र बंद करून छोटे-छोटे धिरे दिले, पावसाळा असताना देखील या ठेकेदाराने ओढ्यात येणारे पाणी वाहून जाण्याची काळजी न घेतल्याने सदाशिवनगर, मध्यमेश्वरनगर, मारूतीनगर, गंगानगर, रघुनाथ गॅस परिसर, ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील घरात पाणी घुसले. यामुळे लाखोंचे नुकसान झाले. संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी व त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आपद्ग्रस्तांनी केली.
जामखेड तालुक्यात नुकसान
जामखेड : जामखेडसह तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून, या पावसाने नान्नज येथे भिंत कोसळून महिला जखमी झाली तर एक शेळी मृत्युमुखी पडली. नायगाव, बांधाखडक, देवदैठण या परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे घरात पाणी घुसले. नायगाव, मोहरी तलाव ओव्हर फ्लो तर भुतवडा तलाव ९० टक्के भरला आहे. दुसऱ्या दिवशी संपूर्ण तालुक्यात पाऊस आहे.
जामखेडसह तालुक्यात पावसाने शनिवार, दि. ३० रोजी रात्री नऊ वाजल्यापासून जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नान्नज येथे घराची भिंत कोसळून विमल नामदेव बोराटे यांचा पाय फॅक्चर झाला असून, उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. तर सिंधूबाई गोरख मोहळकर यांची एक शेळी मयत झाली आहे.
जामखेड ६२ मि.मी., अरणगाव २०, नायगाव १३० मि.मी., नान्नज ४९ व खर्डा ४३ मि.मी. असा पाऊस झाला. नायगाव, बांधखडक, देवदैठण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. नायगाव येथे दोन घरांची भिंत पडली तसेच पाच ते सहा घरात पाणी घुसले. देवदैठण येथे मुरलीधर साहेबराव भोरे यांच्या दोन एकर क्षेत्रात असलेले बाजरीचे पीक वाहून गेले आहे.
नायगाव, मोहरी तलाव हे ओव्हर फ्लो झाले आहे तर भुतवडा तलाव ९० टक्के भरला आहे. नदी, नाले, छोटे पाझर तलाव, बंधारे भरले आहेत तर काही तलावात पाणीसाठा होत आहे. रविवार, दि. ३१ रोजी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, तलावात पाणीसाठा वाढत आहे.
(तालुका प्रतिनिधी)
कौतुकीला पूर
सोनई : शनिवारी रात्री सोनई परिसराला पावसाने अक्षरश: झोडपले. सतत ४ तास मुसळधार पाऊस चालू होता. गेल्या ५ दिवसांपासून सोनई परिसरावर काही ना काही प्रमाणात पडणाऱ्या पावसाने शेतकरी सुखावलेले आहे.
गेल्या ३ महिन्यात या भागात पाऊसच नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले होते.
शनिवारचे पावसाने सोनईची कौतुकी नदी दुधडी भरून वाहिली. तसेच जवळपासचे ओढे नाले पाण्याने भरभरून वाहत होते. कौतुकी नदीतील पाणी काही ठिकाणी गावात घुसलेले होते तसेच सोनई-घोडेगाव व राहुरी, सोनई वाहतूक रात्री ५ तास बंद पडलेली होती.
शनिवारी सायंकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने एकच धावपळ उडाली. पावसाचा जोर पाहून कुणीही बाहेर पडत नव्हते. सतत ४ तास हा पाऊस पडत होता. गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांचीही धावपळ उडाली. रविवारी दुपारपर्यंत ओढे नाले वाहत होते. गेल्या ५-७ वर्षात असा जोरदार पाऊस पाहिलेलाच नसल्याचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सांगितले. समाधानकारक पावसाने रविवारचे बाजारात भाजीपाल्याचे मिरचीचे भाव निम्म्याने खाली आल्याचे जाणवले.
(वार्ताहर)
सीना धरण
जोरदार पावसामुळे निमगाव (गांगर्डा) येथील सीना धरण पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होत असून, या महिन्यात धरण ओव्हर फ्लो होण्याचा अंदाज आहे. जून-जुलै महिने कोरडे गेले. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्याने सीना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सीना धरण कोरडेठाक पडण्याच्या स्थितीत असता कुकडीच्या आवर्तनाने भोसे खिंडीतून सीना धरणात सोडण्यात आले. सीना नदीतून पाण्याचा फ्लो चालू असून, २८ तारखेपासून कुकडीचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या महिनाभरात सीना धरण ओव्हर फ्लो होईल असा अंदाज आहे.
रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तिसगाव शहरात जोरदार पाऊस झाला़ या पावसाने तिसगावच्या वेशीजवळील नदीला पूर आला़ त्यामुळे तिसगाव शहर परिसरातील कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प होती़
कोरडगाव
कोरडगाव : नुकत्याच झालेल्या पावसामुळे कोरडगाव येथील वार्ड क्रमांक २ मध्ये अनेक घरांना पाण्याने वेढा टाकला असून, त्यामुळे रोगराई निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाण्याच्या वेढ्यातून सुटका करण्याची मागणी नागरिकांनी केल्यानंतर प्रशासनातर्फे पहाणी करण्यात आली. दरम्यान, पाणी काढण्याच्या प्रयत्न सुरू असताना काहींनी त्यास विरोध केला. त्याचा अहवाल तलाठ्याने तहसीलदारांकडे पाठविला आहे. तहसीलदारांनी यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अवधूत बोंद्रे यांनी केली आहे. अर्जुन चन्नेकर, भिमराज चन्नेकर, अर्जुन देशमुख, बबन देशमुख, दिलीप घायाळ, दामू गायके अशा अनेक घरांना पाण्याने वेढा टाकला आहे.
चार वर्षानंतर पाणी
अहमदनगर तालुक्यातील पिंपळगावच्या तलावात चार वर्षानंतर पाणी साठले आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने तलावात ३० ते ३५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या तीन वर्षापासून या तलावातून अखंडपणे गाळ आणि मुरूमाचा उपसा सुरू होता. यामुळे तलावाची साठवण क्षमता दुप्पट झाली आहे.
तलावाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा तलावात पाणी साठवण होण्यास सुरूवात झाली असून परिसरात जोरदार पाऊस झाल्यास तलाव भरण्याची शक्यता वाढली आहे.
घरात पाणी
सावेडी उपनगरातील नरहारीनगरमधील नागरिकांच्या घरात पाणी घुसले़ मुसळधार पावसामुळे परिसरातील रस्त्यांना नाल्यांचे स्वरुप आले होते़ नाल्यांची सफाई केल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे़ सावेडी उपनगरातील नरहरीनगरमधील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याची घटनेमुळे महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे़ विविध ठिकाणी रस्ते जलयम झाले़ गणेशोत्सवात पावसाने हजेरी लावल्यामुळे गणेश मंडळांची धावपळ उडाली़
पाऊस...कुठे, किती?
जामखेड- ६२़०३, नगर- ५२, कर्जत- ५०, नेवसा- २६, पारनेर- १८, पाथर्डी- १५, शेवगाव- ९, श्रीगोंदा- ५, संगमनेर- ४, कोपरगाव- ४, राहुरी- ४़ ६, अकोले- १ (आकडे मि.मी.त)
ओढे भरले, घरे पाण्यात
नेवासा : नेवासा शहरातील ब्रिटीश पुलाजवळील ओढा शनिवारी रात्री झालेल्या पावसाने तुडुंब भरल्याने ओढ्याचे पाणी शहरातील प्रभागात घुसले. यामुळे प्रभागातील अनेक घरांची पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यात लाखोंचे नुकसान झाले. आमदार शंकरराव गडाख यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आपद्ग्रस्तांचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांसह आ.गडाख यांनी नेवासा शहरातील प्रभागातील आपद्ग्रस्तांची भेट घेऊन पाहणी केली.
नेवासा शहरामध्ये शनिवारी सायंकाळपासून पावसास सुरुवात झाली. शहर व परिसरात पावसाने जोर धरल्याने ओढ्या नाल्याचे पाणी ब्रिटिश ओढ्याला येऊन मिळाले. मात्र याच पुलाजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला भराव घातल्याने ओढ्याचे पाणी ओढ्याच्या बाजूला असलेल्या नेवासा शहरातील मध्यमेश्वर नगर, मारूतीनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, रामकृष्णनगर, गंगानगर या प्रभागामध्ये कमरे इतके पाणी शिरले. यामध्ये अनेकांचे संसार रस्त्यावर आले. काहींच्या घराची पडझड झाली. यामुळे लाखोंचे नुकसान झाले. रात्रभर या भागातील नागरिकांनी रात्र जागून काढली. तहसीलदार हेमा बडे यांनी रात्रभर या परिसरात फिरून आपद्ग्रस्त नागरिकांना दिलासा दिला. रविवारी (दि.३१) रोजी आ.शंकरराव गडाख यांनी पंचायत समिती सभागृहात तातडीने बोलविलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीस प्रांताधिकारी कदम, जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, पंचायत समितीचे सभापती कारभारी जावळे, तहसीलदार हेमा बडे, गटविकास अधिकारी रामकृष्ण कर्डिले उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.शंकरराव गडाख म्हणाले, ओढ्यातील पाणी थोपविल्या गेल्याने प्रभागातील नागरिकांवर ही आपत्ती ओढवली आहे. ओढ्याचे पाणी घरात शिरून नुकसान झालेल्यांचे त्वरित पंचनामे करण्यात येणार असून, आपद्ग्रस्तांच्या घरांचे फोटो व व्हिडिओ शुटींग घेऊन मदतीसाठी पंचनाम्याचा प्रस्ताव दोन दिवसात पाठवावा असे संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यासाठी विशेष बाब म्हणून आपण ही शासनाकडे मदतीची मागणी करणार असून, तातडीची मदत ही करणार असल्याचे सांगितले. घटना मानव निर्मित आहे. दुर्लक्षामुळे येथील जनतेवर ही आपत्ती कोसळली. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आ.गडाख यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Overwhelm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.